प्रतिनिधी/ सातारा
अंगापूर, (ता.सातारा) येथील गुरुवर्य ग्रामीण पतसंस्थेच्या सेव्हिंग खात्यावरील 43 लाख 3 हजार 790 रुपये स्वत:च्या फायद्यासाठी वापरून मुदतठेव पावत्यांच्या पैशाचा भरणा संस्थेत न भरता तो फायद्यासाठी वापरुन संस्थेची व सभासदांची फसवणूक केली. याप्रकरणी पतसंस्थेतील तीन कर्मचाऱयांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2019 दरम्यान, अंगापूर (ता.सातारा) येथील गुरुवर्य ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या लेखापरीक्षणामध्ये कर्मचारी हणमंत आनंदराव कणसे, अमोल गजानन काळे, अनिल किसन कणसे (सर्व रा. अंगापूर, ता. सातारा) यांनी एकत्रित संगनमताने पतसंस्थेची फसवणूक केली आहे. या तिघांनी बँक खात्यातून पैसे काढणे, त्या पैशाचा व्यवहारात फिर्यादीला न घेणे, ठेवीदारांच्या सेव्हिंग खात्यातील रकमा स्वत:च्या फायद्यासाठी वापरणे, मुदतठेव पावत्यांच्या पैशाचा भरणा संस्थेत न करता स्वत:च्या फायद्यासाठी वापरणे, एलआयसी तारण कर्ज, वाहन तारण कर्ज, कोणत्याही कागदपत्राशिवाय पैसे स्वत:च्या खात्यावर जमा करणे या गोष्टी केल्या. यामध्ये त्यांनी पतसंस्थेची एकूण 43 लाख 3 हजार 790 रूपयांची गैरव्यवहार करून सभासद, ठेवीदार व संस्थेची फसवणूक केली आहे.
संस्थेच्या कामकाजात सेवकांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून संचालक मंडळाला अंधारात ठेवून मनमानी कारभार केलेला आहे. ठेवीदारांच्या तक्रार अर्जानुसार ठेवींच्या पैशाचा अपहार करून सभासदांची फसवणूक केली आहे. कर्मचाऱयांनी केलेल्या आर्थिक बाबींची मासिक सभेत मंजुरी घेण्याबाबतचे प्रोसिडींग तपासकामी सादर न केल्याची तक्रार अनिता दत्ता उबाळे (रा. हिराबाई अपार्टमेंट, शाहुपुरी) या सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. या गुन्हय़ाचा पुढील तपास हवालदार देशमुख करत आहेत.