स्वॅब तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गर्दी
प्रतिनिधी/ बेळगाव
गुरूवारी जिह्यात कोरोनाचे 25 नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिह्यातील एकुण बाधितांची संख्या 26 हजार 259 इतकी झाली आहे. दरम्यान शुक्रवार दि. 1 जानेवारीपासून दहावी-बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमिवर स्वॅब तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये विद्यार्थी व पालकांची गर्दी वाढली आहे.
रामलिंगखिंड गल्ली, शिवबसवनगर, टिळकवाडी, रामतीर्थनगर, महाबळेश्वरनगर, कुरबरहट्टी-येळ्ळूर, होळीकोप्प, के. के. कोप्प, हुलीकवी, हलगा, हिंडलगा, पिरनवाडी, हुदली परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून बिम्स्मधील एका डॉक्टरसह तीन कर्मचाऱयांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
सक्रिय रुग्ण संख्या 192 इतकी आहे. प्रशासनाला अद्याप 8 हजार 948 जणांच्या स्वॅब तपासणी अहवालांची प्रतिक्षा आहे. विद्यार्थी, शिक्षकांच्या स्वॅब तपासणीमुळे प्रयोग शाळेवरील भार वाढला आहे. आयएमए हॉलसमोर विद्यार्थी, शिक्षकांच्या रांगा वाढल्या आहेत. एकच काऊंटरमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
आतापर्यंत 25 हजार 725 जणांनी कोरोनावर मात केली आहे. दहावी-बारावीचे वर्ग सुरू होणार या पार्श्वभूमिवर स्वॅब तपासणी अहवाल मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होवू लागली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील सध्याची व्यवस्था लक्षात घेता विद्यार्थ्यांना गैरसोयीचे असून गर्दीमुळे उलट कोरोनाचा धोका वाढतो आहे. त्यामुळे प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी केली जात आहे.