शाळा सीलडाऊन : आठवडाभराची सुटी : बाधित विद्यार्थी होम आयसोलेशनमध्ये
बेंगळूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य शिक्षण खात्याने कोविड मार्गसूचीनुसार राज्यातील माध्यमिक शाळा, पदवी, पदवीपूर्व महाविद्यालये पूर्ण प्रमाणात सुरू केली आहेत. दरम्यान, गुलबर्गा शहरातील सरकारी माध्यमिक शाळेतील 15 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. हे विद्यार्थी नववी आणि दहावी इयत्तेतील आहेत. विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून आल्याने शाळा सीलडाऊन करण्यात आली आहे. तसेच आठवडय़ाची सुटी घोषित करण्यात आली आहे. दरम्यान बाधित विद्यार्थ्यांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत.
गुलबर्गा येथील सरकारी माध्यमिक शाळेत समुदाय आरोग्य केंद्रांच्या कर्मचाऱयांनी 1 मार्च रोजी 63 विद्यार्थ्यांची कोविड चाचणी केली होती. त्यापैकी 22 विद्यार्थ्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यातील 15 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवासासंबंधीची माहिती तपासली असता 26 फेब्रुवारी रोजी बेडसूर तांडा व 18 फेब्रुवारी रोजी नामू तांडा येथील विवाह समारंभात मुंबईतील लोक सहभागी झाले होते. त्यांच्यापासून विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजशेखर माली यांनी दिली.