वार्ताहर / सावंतवाडी:
गुळदुवे परिसरात मुंबईतील मालाडहून आलेल्या तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाला होता. त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. गेल्या आठवडय़ात या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्याच्यासोबत पत्नी व मुलगा होता. त्यांचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, असे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी तालुक्यातील गुळदुवे येथे मालाड येथून पती, पत्नी, मुलगा असे तिघेजण गावी आले होते. गुळदुवे प्राथमिक शाळेत एक दिवस क्वारंटाईन झाल्यानंतर तरुणाला त्रास होऊ लागल्याने मळेवाड आरोग्य केंद्रात नेत असता वाटेत त्याचे निधन झाले होते. त्याचा मृत्यू कोरोनामुळे झाला असावा, अशी शंका होती. त्यामुळे मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्र सील करण्यात आले होते. सदर तरुणाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम पाटील यांनी सांगितले की, सावंतवाडी येथे त्या तरुणाची पत्नी व मुलगा संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.