पालशेत बाजारपेठ पूल, अंजनवेल बाजारपेठ पूल आणि वरचा पाट बाग पुलावर पाणी
प्रतिनिधी / गुहागर
गुहागर तालुक्यात मंगळवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. गेल्या 24 तासात गुहागर तालुक्यात सरासरी 110 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गुहागर शहरातील पर्जन्यमापकातून 130 मिलिमीटर नोंद केली आहे. यामुळे गुहागर तालुक्यातील पालशेत बाजारपेठ पुलावरून पाणी गेल्याने पहाटे 5 तास येथील वाहतूक ठप्प होती. गुहागर तवसाळ मार्गावरील पालशेत येथील हा पूल कमी उंचीचा असल्याने या पुलावरून दरवर्षी पाणी जाते. बुधवारी दुपारी दोन वाजल्यापासून पुलावरील वाहतूक ठप्प होती. बाजारपेठेतील 25 ते 30 मच्छिमार कुटुंबाच्या घरांमध्ये पाणी शिरण्याचा प्रकार घडला. मच्छी मार्केट, रिक्षा स्टँड आदी ठीकाणे नदीच्या पुराच्या पाण्याने भरले गेले होते. या पाठोपाठ अंजनवेल गावातीलही भरती-ओहोटीमुळे पुलाच्या पाण्याची धोक्याची पातळी ओलांडली होती. या ठिकाणी पुलाला अडकलेला कचरा बाजूला केल्यानंतर बाजारपेठेतील वाहतूक सुरू झाली. गुहागर वेलदुर मार्गावरही वरचा पाट बागेतील मोठ्या पुलावरुन पाणी गेले. येथील वाहतूकही गेले तीन तास ठप्प झाली होती. बुधवारी दिवसभर गुहागर तालुक्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे.