कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)चा विद्युत पुरवठा व पाणी पुरवठा खंडीत करण्याच्या अप्पर जिल्हाधिकार्यांच्या आदेशास पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. पुणे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी हे आदेश दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम 1999 च्या कलम 10(6) मधील तरतुदीचा भंग केल्याबद्दल अपर जिल्हाधिकाऱ्यांनी उक्त अधिनियमाच्या कलम 21(5) मधील तरतुदीनुसार कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि. कोल्हापूर संस्थेचा बी -1, एम.आय.डी.सी गोकुळ शिरगांव येथील दुग्धप्रक्रीया प्रकल्पाचा तसेच नागाळा पार्क, कोल्हापूर येथील कार्यालयाचा विद्युतपुरवठा व पाणीपुरवठा दिनांक 1 फेब्रुवारी 2020 पासून खंडीत करण्याचा आदेश 10 जानेवारी 2020 रोजी जारी केला होता. या आदेशाला पुणे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी स्थगिती दिली आहे.