प्रतिनिधी / गोकुळ शिरगाव
गोशिमा च्यावतीने गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहती मधील कर्मचाऱ्यांच्यासाठी COVID 19 लसीकरण शिबिर आमदार चंद्रकांत जाधव यांच्या उपस्थितीत आज सुरू झाले.
गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक, कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी या लसीकरण शिबिराचे आयोजन केले आहे. या कोरना काळात लॉकडॉउनमध्ये सुद्धा उद्योजकांनी आपले उद्योग चालू ठेवले. लोकांची कुटुंबं चालायची असतील, तर उद्योग चालवणे गरजेचे आहे. म्हणूनच या कोरना काळात उद्योग चालवण्यासाठी कर्मचारी खूप महत्त्वाचा घटक आहे. मधल्या बंद काळात सगळे व्यवसाय बंद होते. पण औद्योगिक वसाहतीसाठी सरकारने सूट दिल्याने उद्योजकांचे उद्योग चालू झाले. यामध्ये बऱ्याच उद्योजकांच्या बरोबरच कामगार वर्गाला या कोरना महामारीचा सामना करावा लागला. शासनाकडून आपल्याला हवे तेवढ्या लस उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे आज गोशिमा संस्थेने पुढाकार घेऊन सिद्धिविनायक हॉस्पिटल येथील डॉ. देसाई यांच्या बरोबर संपर्क करून सर्वात कमी दरात गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील सर्व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना लस उपलब्ध करून देऊन एक चांगले काम केल्याचे आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले.
यावेळी गोशिमा अध्यक्ष श्रीकांत पोतनीस, मोहन पंडितराव, नितीनचंद्र दळवाई, दिपक चोरगे, स्वरूप कदम, रणजीत पाटील, विश्वजीत कुलकर्णी, संजय देशिंगे, राजेंद्र माळी, अजिता आजरी यांच्यासह उद्योजक व कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर लसीकरणात कोविशिल्ड ही सिरम इन्स्टिटयूटची लस ₹ ७३०/- इतके शुल्क आकारून देण्यात येत आहे. सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ. संजय देसाई आणि त्यांचा मेडिकल स्टाफ यांच्या विशेष देखरेखीखाली हे शिबीर घेण्यात येत आहे.