ऑनलाईन टीम / मुंबई :
‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. त्यावरुन वाद निर्माण झाला असून, राष्ट्रवादीतही दोन गट पडल्याचे दिसत आहे. मात्र, या प्रकरणात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अमोल कोल्हेंची पाठराखण केली आहे.
पवार म्हणाले, चित्रपटातील भूमिका आणि व्यक्तीगत आयुष्य यामध्ये फरक असतो. ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात 2017 साली अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका केली. तो चित्रपट अजून रिलिज झाला नाही. गोडसेची भूमिका साकारली म्हणजे ते गांधीविरोधक असू शकत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांवरील आधारीत चित्रपटात एखाद्या अभिनेत्याने औरंगजेबाची भूमिका केली म्हणजे तो मुघल साम्राज्याचा पुरस्कर्ता होत नाही. अभिनेता म्हणून तो भूमिका घेतो. एक कलाकार म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे.
एखाद्या रामराज्यासंबंधी चित्रपटात राम आणि रावण यांच्यातील संघर्ष दाखवला असेल तर तर रावणाची भूमिका करणारी व्यक्ती रावण असू शकत नाही. सीतेचं अपहरण केलं याचा अर्थ प्रत्यक्ष सीतेचं अपहरण त्या कलाकारने केलं असा होत नाही. रावणाचा इतिहास त्यातून दाखवण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे अमोल कोल्हेंची भूमिका एक अभिनेता म्हणून पाहिली पाहिजे, असेही पवार म्हणाले.