साडेतीन लाख रुपयांचे लॅपटॉप जप्त : दोन चोरटय़ांना अटक
प्रतिनिधी/ सातारा
येथील लॅपटॉप वर्ल्ड दुकानाचे गोडावून फोडून लंपास केलेले 3 लाख 55 हजार 860 रुपये किमतीचे चार लॅपटॉप जप्त करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. सत्यम नानासो सुळके (वय 22, सध्या रा. महागाव, ता. सातारा, मूळ रा. वनवासवाडी), विश्वतेज संजय पवार (वय 20, सध्या रा. राधिका चौक, सातारा, मूळ रा. वेळे, ता. वाई) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी जिह्यातील घरफोडीचे चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना केल्या होत्या. त्या अनुषंगाने सर्जेराव पाटील तपास करत असताना त्यांना एक युवक शहरातील जिल्हा परिषद चौकामध्ये चोरीमधील लॅपटॉप विक्री करण्यास येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला त्या युवकाला ताब्यात घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
पथकाने सातारा जिल्हा परिषद चौकामध्ये सापळा लावला असता एक युवक त्याच्या साथीदारासमवेत दिसून आला. त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे 3 लाख 55 हजार 860 रुपये किमतीचे चार लॅपटॉप मिळून आले. सखोल चौकशी केली असता त्यांनी संबंधित लॅपटॉप सातारा येथील शाहू चौकात असणाऱया लॅपटॉप वर्ल्ड दुकानाच्या गोडावूनमधून चोरल्याची कबुली दिली.
या कारवाईमध्ये सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱहाड, पोलीस हवालदार सुधीर बनकर, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, पोलीस नाईक शरद बेबले, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, पोलीस कॉन्स्टेबल विशाल पवार, मयूर देशमुख, धीरज महाडिक, रोहित निकम, संकेत निकम, वैभव सावंत सहभागी झाले होते.