अज्ञात महिलेचे कृत्य, म्हापसापर्यंत आल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद, पोलिसांकडून शोध सुरु, सर्वत्र नाकाबंदी
प्रतिनिधी / म्हापसा
गोमेकॉच्या आवारात एका माहिन्याच्या बालकाचे अज्ञात महिलेने अपहरण करून सिनेस्टाईलने पलायन केल्याने शुक्रवारी संध्याकाळी ते रात्रभर पोलिसांची तारांबळ उडाली. विशेष म्हणजे ती महिला खासगी बसने म्हापसाच्या दिशेने पळाल्याची माहिती पोलिसांना मिळताच सर्व पोलीस स्थानकाच्या प्रमुखांनी म्हापशात धाव घेतल्याने सायंकाळच्या वेळी म्हापसा हुतात्मा सर्कलजवळ सर्वत्र पोलीस छावणीचे स्वरुप आले होते. रात्री उशिरापर्यंत पोलीस त्या अज्ञात महिलेचा शोध घेत होते.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक बिगर गोमंतकीय माहिला लालींदर समोरा ही दुपारी 2 वा. दरम्यान सामोसा आणण्यासाठी गोमेकॉच्या आवारात गेली असता तिने आपले एक महिन्याचे बालक तेथे असलेल्या एका महिलेकडे दिले. याचा फायदा घेत ती महिला तेथून पसार झाली. सामोसा घेऊन बालकाची आई आली असता त्याठिकाणी ती महिला बालकासह गायब झाली होती. त्यानंतर सदर बालकाच्या आईने शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ती महिला तेथून गायब झाली होती. अखेर शोध घेऊन आपले बालक कुठेच सापडत नसल्याचे पाहून ती मोठमोठय़ाने रडू लागली. नेमके काय झाले हे कुणालच माहित नाही. अखेर ती बालकाची आई मोठय़ाने रडत असल्याचे पाहून आजूबाजूचे लोक तिच्याकडे धावून आले व चौकशी करू लागले. त्यावेळी बालकाला कुणीतरी पळून नेल्याचे स्पष्ट झाले.
ही माहिती वाऱयासारखी सर्वत्र पसरली. घटनेची माहिती आरोग्यमंत्र्यांपर्यंत पोचली असता त्यांनी त्वरित घटनेची माहिती पोलीस अधिकाऱयांना दिल्यावर सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी वर्ग घटनास्थळी पोहचले. त्यानंतर शोध माहिमेला सुरुवात झाली.
हणजूण येथील रवी नामक इसमाने त्या बालकाला महिलेने नेल्याचे पाहिले. आपण तेथे होतो. सदर अज्ञात महिला बरीक व लाल रंगाची साडी नेसून होती. पायलट करून ती पणजी बसस्थानकावर आली तेथून ती माशेलच्या दिशेने गेल्याचा अंदाज आहे. कारण तीने पायलटला आपल्याला माशेलला सोडता काय असे विचारले होते. मात्र त्या पायलटने 300 रुपये सांगितल्याने तीने तो बेत सोडला व आपण बसनेच जाते असे सांगून बाहेर पडली, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
म्हापसा चाचा नेहरू गार्डनजवळ उतल्याचे स्पष्ट
दरम्यान सदर महिला त्या बालकाला घेऊन म्हापसा हुतात्मा चौकात खासगी बसने उतरल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी त्या कंडक्टरची चौकशी केली असता तिने आपले बाळ लहान आहे आपणाला तेथून इथपर्यंत चालत यावे लागेल. त्यामुळे आपल्याला इथेच उतरा असे सांगितल्याने ती चाचा नेहरू गार्डजवळ उतरली. तेथून सुरज बुकस्टॉलपर्यंत गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. नंतर मधेच पायणी मधून गायब झाली. पोलीस त्या महेलेची कसून चौकशी करीत आहेत. सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे. उपअधीक्षक गजानन प्रभूदेसाई गजानन प्रभूदेसाई यांच्या नेतृत्वाखाली तुषार लोटलीकर, निरीक्षक राणे, निरीक्षक गडेकर आदी पोलीस फौजफाटा त्या महिलेच्या शोधात आहेत. दरम्यान, अज्ञात महिले विरोधात आगशी पोलीस स्थानकात अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
राज्यात गुन्हेगारीची प्रकरणे वाढली : दिगंबर कामत
राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळी असून गुन्हेगारी प्रकरणे वाढत आहेत. सरकार केवळ बघ्याची भूमिका पार पाडत असल्याची टीका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे. गोमेकॉतून दिवसाढवळ्या एक महिन्याच्या बालकाचे अपहरण होते या पेक्षा लाजीरवाणी गोष्ट कोणती असणार असेही कामत म्हणाले.