मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत यांचे आश्वासन
प्रतिनिधी / पणजी
गोमेकॉत ऑक्सिजन पुरवठय़ावरुन वाद-विवाद सुरू झाले असून त्याचा पुरवठा वेळेवर होण्याची समस्या सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे. दरम्यान, ऑक्सिजनची गरज नसलेल्या कोरोना रुग्णांना श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर कोरोना निगा केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री डॉ. सावंत तसेच आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गोमेकॉला भेट देऊन ऑक्सिजन पुरवठय़ाबाबतची माहिती घेतली. तेव्हा पत्रकारांनी त्यांना ऑक्सिजनबाबत अनेक प्रश्न केले. यावर ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे काम पाहण्यासाठी असेलेल्या पथकाशी चर्चा केल्याचे सांगून ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता भासणार नाही. ते कुठूनही उपलब्ध करून पुरविण्यात येतील. फक्त त्यांची गरज किती आहे, कळणे गरजेचे आहे, असे डॉ. सावंत यांनी नमूद केले.
गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी यामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता असून सर्वांचा समन्वय चांगला राहिला पाहिजे. हे काम एकटय़ाचे नसून सर्वांचे ‘टीम वर्क’ आहे. जे काही घडते त्यासाठी एकटय़ाला जबाबदार धरता येणार नाही. सर्वांनी सहकार्य केले तरच कोरोनाच्या विरोधात लढणे शक्य होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
पूर्ण लॉकडाऊन केले तर लोक आणखी बिथरतील व विनाकारण गर्दी करतील, असे मत डॉ. सावंत यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, पालिकांनी लॉकडाऊन केले तरी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद ठेवू नका ती सुरू ठेवणे हिताचे आहे. हॉस्पिटल कर्मचारी, औषध कंपनीचे कर्मचारी व इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, अधिकाऱयांना लॉकडाऊन मधून वगळावे. त्यांना घरात राहण्याची सक्ती करू नका, तर त्यांना योग्य त्या सेवेकरीता घराबाहेर जाण्यास अनुमती असावी. जे बिनकामाचे फिरतात त्यांना घरी बसवावे, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले. रुग्णांनी तातडीने तपासणी करून लक्षणे दिसताच औषधे सुरू करावीत, अशी विनती त्यांनी गोमंतकीय जनतेला केली आहे.
आठ अधिकाऱयांची कोरोना व्यवस्थापनासाठी नेमणूक
राज्य सरकारने आठ अधिकाऱयांची कोरोना व्यवस्थापनासाठी नेमणूक केली असून त्यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पर्सनल खात्याने तसा आदेश जारी केला आहे. त्यात आयएएस अधिकाऱयांचाही समावेश आहे. अंकिता आनंद, मेथला चैतन्य प्रसाद, नारायण गाड, कुलदीप आरोलकर, दीपक देसाई, जॉन्सन फर्नांडिस, आशुतोष आपटे, अरविंद खुटकर आदी आठ आधिकाऱयांच्या नावांचा समावेश आहे. काहींना उत्तर गोवा जिल्हय़ात तर काहांना दक्षिण गोवा जिल्हय़ात कोविड व्यवस्थापनाच्या विविध कामांसाठी नेमण्यात आले आहे.