विश्वचषक पात्रता फेरी – कतारची भारतावर 1-0 फरकाने मात, अब्देलचा 33 व्या मिनिटाला एकमेव गोल
दोहा / वृत्तसंस्था
10 खेळाडूंनिशी खेळावे लागलेल्या भारतीय फुटबॉल संघाला आशियाई चॅम्पियन्स कतारविरुद्ध 0-1 फरकाने पराभव पत्करावा लागला. मात्र, या लढतीत भारतीय गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधूचे अप्रतिम गोलरक्षण महत्त्वाचे ठरले. त्याच्या काही उत्तम बचावामुळेच भारताला मोठा पराभव टाळता आला. कतारतर्फे या सामन्यातील एकमेव गोल अब्देल अझिझने 33 व्या मिनिटाला केला.
यापूर्वी, सप्टेंबर 2019 मध्ये उभय संघातील पहिल्या फेरीतील लढत गोलशून्य बरोबरीत राहिली व भारताचा तो एक प्रकारे पराक्रमच होता. त्यावेळी देखील गोलरक्षक संधूचे योगदानच सर्वाधिक महत्त्वाचे ठरले होते. गुरुवारी येथे रंगलेल्या दुसऱया टप्प्यातील लढतीत भारताला निसटता पराभव पत्करावा लागला असला तरी एक अपवाद वगळता संधूचे गोलरक्षण अर्थातच महत्त्वाचे ठरले.
दोहातील या लढतीत भारताला 18 व्या मिनिटापासून पुढे केवळ 10 खेळाडूनिशी खेळावे लागले. राहुल भेकेला आऊटसाईड द बॉक्स चेंडू हाताळल्याबद्दल दुसरे यलो कार्ड दिले गेले आणि यानंतर त्याला बाहेर व्हावे लागले. या सामन्यातील 9 व्या मिनिटाला त्याला पहिले यलो कार्ड दाखवले गेले होते.
भारतीय संघ आगामी फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत खेळू शकणार नाही, हे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. मात्र, 2023 आशियाई चषक स्पर्धेतील पात्रतेसाठी भारत प्रयत्नशील आहे. इगोर स्टिमॅकचे प्रशिक्षण लाभत असलेल्या भारतीय संघाला उरलीसुरली पत राखण्यासाठी आणखी दोन सामन्यात संधी असेल. भारत यानंतर दि. 7 जून रोजी बांगलादेशविरुद्ध तर 15 जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध लढणार आहे. गटात अव्वलस्थानी असणारा कतारचा संघ अद्याप अपराजित असून त्यांनी भारताविरुद्ध सातत्याने आक्रमणे करत वर्चस्व राखले. बॉल पझेशनच्या आघाडीवर त्यांनी 66 टक्के तर भारताने 34 टक्के वर्चस्व प्रस्थापित केले. संधूचे गोलरक्षण मात्र निव्वळ अप्रतिम राहिले. त्याने कतारची 9 हुकुमी आक्रमणे मोडीत काढली.
कोरोनातून सावरलेला भारतीय कर्णधार सुनील छेत्री दुसऱया सत्रात उदांता सिंगच्या जागी मैदानात आला. 6 सामन्यात एकही विजय संपादन करता न आलेला भारताचा संघ 3 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. अफगाणिस्तानचा संघ 5 गुणांसह तिसऱया स्थानी आहे. त्यांनी यापूर्वी बांगलादेशविरुद्ध 1-1 अशी बरोबरी मिळवली होती.
कतारने भारताविरुद्ध 33 व्या मिनिटाला गोल केला आणि हा सामन्यातील एकमेव गोल ठरला. मोहम्मद मुन्टारीने अब्देल अझिझ हातिमकडे पास दिला आणि त्याने गोलजाळय़ाचा अचूक वेध घेत गोलकोंडी फोडली. 42 व्या मिनिटाला सुनील छेत्रीने काऊंटर ऍटॅक केला होता. मात्र, कतारच्या गोलरक्षकाने हा हल्ला यशस्वीरित्या थोपवला होता.