वार्ताहर/ संगमेश्वर
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गोळवली येथे बस आणि सुमो यांच्यामध्ये झालेल्या अपघातात सुमो चालकासह दोन प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली. हा अपघात रविवारी रात्री 10.30वा. सुमारास घडला.
या अपघाताची माहिती बस चालक उमेश सदाशिव मुसळे यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 5 नोव्हेंबर रोजी ते रत्नागिरी एस्टी डेपोची बस क्रमांक एम एच 14 बीटी 2557 ही बस रत्नागिरी ते मुंबईला घेवून गेले होते. त्यानंतर ते 6 सप्टेंबर रोजी परतीच्या प्रवासाला निघाले होते. त्यांच्या गाडीमध्ये मुंबई ते रत्नागिरीमधील 13 प्रवासी प्रवास करत होते. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गोळवली टप्पा येथे बस आली असता संगमेश्वर दिशेकडून चिपळूणच्या दिशेने जाणाऱया सुमो गाडी क्रमांक एम. एच. 07 क्यु 9782 वरील चालक जस्टीन जन्सन (30 रा. झाराप ता. कुडाळ मुळ रा. उत्तरप्रदेश) अतिवेगाने हेलकावे देत बसला येवून धडकला.
या अपघातात जस्टीन जन्सन सह 3 प्रवाशांपैकी दोन प्रवासी असे एकूण तीघेजण जखमी झाले आहेत. या अपघातांची खबर मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. या अपघाताची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.