प्रशासनला उशिरा सुचले शहाणपण
प्रतिनिधी /बेळगाव
गोवावेस येथील चंपाबाई भोगले शाळेसमोर धोकादायक स्थितीत डेनेज चेंबर होते. या धोकादायक चेंबरबद्दल ‘तरुण भारत’ने वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासनाला जाग आली. बुधवारी या चेंबरच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. प्रशासनाला उशिरा का होईना? शहाणपण आले, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
चंपाबाई भोगले शाळेच्या बाजूने महात्मा फुले रोडकडे संपर्क रस्ता जातो. या रस्त्यावरच एक चेंबर ठेवण्यात आले होते. हे चेंबर रस्त्यापासून उंच असल्यामुळे अनेक अपघात होत होते. रात्रीच्यावेळी तर चेंबर दृष्टीस न पडल्याने अपघातास आमंत्रण ठरत होते. अपघातानंतर आजूबाजूचे नागरिक व रिक्षाचालकांना अपघातग्रस्तांना दवाखान्यात घेऊन जावे लागत होते. वर्षभरापूर्वी या चेंबरचे काम करण्यात आले होते. तेक्हापासून हा चेंबर असेच धोकादायक आहे. नागरिकांनी तक्रार करूनही त्याकडे कोणी लक्ष देत नव्हते. अखेर ‘तरुण भारत’ने यावर प्रकाश टाकताच प्रशासनाला जाग आली. बुधवारी या चेंबरच्या बाजूने सिमेंट घातले व चेंबरची उंची कमी केली. चेंबरची दुरुस्ती केल्याने स्थानिकांनी ‘तरुण भारत’चे आभार मानले.