प्रतिनिधी /बेळगाव
रस्त्यापेक्षा डेनेज चेंबरची उंची वढविण्यात आल्याने हा चेंबर अपघातासाठी आमंत्रण ठरत आहे. रात्रीच्यावेळी वाहनचालकांच्या नजरेस न पडल्यामुळे गोवावेस येथील चंपाबाई भोगले हायस्कूलसमोर अनेक अपघात होत आहेत. पोलीस स्थानक तसेच मनपा कर्मचाऱयांना याबाबत माहिती देऊनही या चेंबरच्या दुरूस्तीविषयी कोणीच प्रयत्न करताना दिसत नाहीत. एखाद्या निरपराध व्यक्तीचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.
गोवावेस येथून महात्मा फुले रोडला जाणाऱया रस्त्यामध्येच हा चेंबर येतो. वर्षभरापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. परंतु रस्त्यापेक्षा चेंबरची उंची अधिक आहे. भरधाव येणारी वाहने या चेंबरला धडकून पडत आहेत. वर्षभरापासून अनेक अपघातही घडले असले तरी या चेंबरच्या दुरूस्तीकडे कोणाचेच लक्ष नाही. हा रस्ता सार्वजनिक बांधकामाच्या अखत्यारित येतो. त्यामुळे त्यांच्याकडे तक्रार करावी, अशी उत्तरे देण्यात आली. वर्ष उलटले तरी अद्याप हा चेंबर आहे त्याच स्थितीत आहे. या चेंबरची दुरूस्ती न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
राजकुमार बोकडे (स्थानिक रहिवासी)
यापूर्वी रस्ता नसल्याने नागरिकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागला होता. आता रस्ता झाला परंतु चेंबरची समस्या जाणवत आहे. रस्त्यापेक्षा चेंबर उंच झाल्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. मोठा अपघात घडण्यापूर्वी प्रशासनाने या चेंबरची उंची तरी कमी करावी, अन्यथा रस्त्याची उंची वाढवावी, असे त्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.