एससी, एसटी, ओबीसी उमेदवारांवर अन्याय : अन्यायग्रस्त उमेदवारांना न्याय देण्याची गरज
प्रतिनिधी /फोंडा
फर्मागुडी येथील गोवा आभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मॅकनिकल विभागामध्ये कंत्राटी व्याख्याते नोकरभरतीमध्ये गोव्यातील पात्र उमेदवारांना डावलून परराज्यातील उमेदवारांना संधी दिली जात आहे. मागील तीन वर्षांपासून हे प्रकार चालले असून कंत्राटाचे नूतनीकरण न करता, त्याच उमेदवारांना पुन्हा या पदामध्ये सामावून घेतले जाते. स्थानिक उमेदवारांनी या मनमानी कारभाराला जोरदार आक्षेप घेत हा अन्याय थांवविण्याची मागणी केली आहे.
मॅकनिकल विभागामध्ये साहाय्यक प्राध्यापकपदांच्या भरतीमध्ये अनुसूचित जाती जमाती (एससी, एसटी) व इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) राखीव जागा असतानाही कर्नाटकातील दोघा उमेदवारांची खुल्या गटातून नियुक्ती करण्यात आली आहे. कर्नाटक राज्यातील ज्या व्याख्यात्याची नियुक्ती केलेली आहे त्याचा ओबीसी दाखला कर्नाटकातील आहे.
सहापैकी केवळ चारच जाग भरल्या
या भरतीच्या जाहिरातीमध्ये चार जागा खुल्या गटात, 1 ओबीसी व 1 एसटी मिळून सहा जागा जाहीर केल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात चार उमेदवारांची भरती करण्यात आली आहे. ओबीसीच्या जागी कर्नाटकातील उमेदवाराची नियुक्ती केली असून एसटीची जागा रिक्त ठेवण्यात आली आहे.
गोव्यातील 18 उमेदवारांना डावललs
या पदांसाठी गोव्यातील 18 उमेदवारांनी मुलाखत दिली होती. या निवड प्रक्रियेसंबंधी एका उमेदवाराने माहिती हक्क कायद्याखाली मिळवलेल्या माहितीमध्ये एकही एसटी उमेदवार नसल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पदभरतीसंबंधी जाहिरात व प्रत्यक्ष भरती प्रक्रियेमध्ये तफावत दिसून येत आहे.
उमेदवार कर्नाटकचा, रहिवासी दाखला गोव्याचा
कर्नाटकातील ज्या उमेदवाराची नियुक्ती करण्यात आली आहे त्याचा रहिवासी दाखला गोव्यातील दाखवण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर तो ओबीसी असल्याबद्दलही संयश व्यक्त होत आहे.
मॅकनिकल विभागाकडून सर्व नियमांना फाटा
मॅकनिकल विभागात कंत्राटी पद्धतीवर साहाय्यक प्राध्यापक भरतीच्या या कंत्राटाच्या नूतनीकरणातही घोळ घातला जात आहे. दरवर्षी या कंत्राटाचे नियमांनुसार नूतनीकरण होणे गरजेचे आहे. मात्र त्याच त्या उमेदवारांचे कंत्राट वाढवून दिले जाते. त्यासाठी कोरोनाचा नियम लावला जात आहे. इतर विभागांतील पदभरतीमध्ये हा नियम लागू होत नाही. शिवाय इतर विभागामध्ये दरवर्षी कंत्राट नूतनीकरणासाठी नव्याने मुलाखती घेतल्या जातात. तसेच या पदांच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात. या नियमांना मॅकनिकल विभागाकडून फाटा दिला जात असल्याच्या तक्रारी आहेत.
जुने नियम बदलण्याची गरज
व्याख्यात्यांच्या पदभरतीमध्ये काही जुने नियम बदलण्याची गरज गोव्यातील पात्र उमेदवारांनी व्यक्त केली आहे. एकेकाळी या पदांसाठी पात्र स्थानिक उमेदवार मिळत नव्हते, त्यामुळे परराज्यातील उमेदवारांची नियुक्ती केली जायची. सध्या गोव्यात आयआयटी, एनएआयटी पदवीधर असलेले पात्र उमेदवार आहेत. ज्यांना गोव्यात नोकऱया मिळत नाहीत. ही परिस्थिती लक्षात घेऊन जुने नियम बदलण्याची मागणी गोव्यातील उमेदवारांकडून केली जात आहे. सध्या नियुक्ती समिती याच जुन्या नियमांचा फायदा घेऊन या पदांसाठी पात्र स्थानिक उमेदवार नसल्याचे भासवून गोमंतकीयांना डावलले जात असल्याची तक्रार आहे.