प्रतिनिधी / म्हापसा
थिवी मतदारसंघातून कोलवाळच्या जिल्हा पंचायत सदस्य कविता कांदोळकर विधानसभा निवडणूक लढविणार आहेत तर गोवा फॉरवर्डचे कार्यकारी अध्यक्ष किरण कांदोळकर स्वतः हळदोणा मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. अशी माहिती किरण कांदोळकर यांनी रेवोडा येथे एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना दिली. कविता कांदोळकरांच्या वाढदिवसानिमित्त रेवोडा येथे आयोजित रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले हाते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.
पक्षाच्या कोअर समितीचे अध्यक्ष विजय सहदेसाई यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला असल्याचे ते म्हणाले. थिवीतील कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीला अनुसरून हा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाची ताकद आमदार वाढविण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आला. किरण कांदोळकर यांनी हळदोणातून निवडणूक लढवावी तर कविता यांनी थिवीतून रिंगणात उतरावे असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. अनेक पंचायतींच्या आजी माजी पंचायत सदस्यांचा त्याला पाठिंबा आहे. तसा निर्णय त्यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीतून घेतला होता. थिवी मतदारसंघातून पहिल्यांदाच महिला उमेदवार निवडून येईल, कार्यकर्ते त्यांना विजयी करतील असाही दावा त्यांनी केला. थिवीतून महिला मतदारांची संख्या जास्त आहे. पक्षाचे विद्यमान आमदार धरून 10 मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. यापूर्वी ते जाहीरही करण्यात आले आहेत. पण भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी एकत्रित यावे अशी लोकभावना असल्याने इतर मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत.
सध्या राज्यातील विरोधी पक्षांची अवस्था वाईट झाली आहे. पण त्यांना लोकांच्या भावनाची अद्याप कदर नसल्याची खंत किरण कांदोळकरांनी व्यक्त केली. सर्व विरोधी पक्ष एकत्रित आले तर भाजपच्या आमदारांची संख्या सिंगल डिजिटवर येईल असाही दावा त्यांनी केला.