प्रतिनिधी / फोंडा
गोवा बागायतदार खरेदी विक्री संस्थेच्या राज्यातील विविध मार्केट यार्डवर काल गुरुवारपासून काजूची खरेदी सुरु करण्यात आली आहे. गोवा बागायतदारच्या विविध तालुक्यातील साधारण दहा मार्केट यार्डवर मिळून एकाच दिवसात 65 टन म्हणजेच सहा हजार किलो काजू खरेदी करण्यात आल्या. प्रति किलो रु. 105 या दरात कालच्या दिवशी काजू खरेदी करण्यात आल्या.
गोवा बागायतदारच्या फोंडा यार्डसह, पेडणे, काणकोण, कुडचडे, शिरोडा, माशेल, साखळी, वाळपई, डिचोली व अस्नोडा यार्डमध्ये सध्या काजू खरेदी सुरु आहे. सकाळी 8.30 ते दुपारी 12.30 वा. यावेळेत ही सेवा उपलब्ध असल्याची माहिती गोवा बागायतदार संस्थेचे अध्यक्ष ऍड. नरेंद्र सावईकर यांनी दिली. कोरोना महामारीच्या संक्रमणामुळे सोशियल डिस्टसिंग राखून व इतर सर्व खबरदारी घेऊनच हा खरेदी व्यावहार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. गोवा बागायतदार ही बागायती व सहकार क्षेत्रातील 54 वर्षे जुनी संस्था असून या संस्थेचा व्यावहार विश्वसनीय व पारदर्शक राहिला आहे. संस्थेच्या सर्व सभासदांचे सहकार्य व विश्वासावर आजवर जो व्यावहार चालत आहे, त्याचप्रमाणे या आणिबाणीच्या काळातही सभासदांनी सहकार्य करावे असे आवाहन नरेंद्र सावईकर यांनी केले आहे. गोव्यातील बागायतदारांना बाजार दराप्रमाणे काजू विक्रीवर योग्य दर देण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान गोवा बागायतदारच्या फोंडा यार्डमध्ये गुरुवारी सकाळी बेतोडा, निरंकाल, केरी, खांडेपारसह इतर आसपासच्या भागातील बागायतदारांनी काजू विक्री केली. सध्या सार्वजनिक व भाडय़ाची वाहतूक बंद असल्याने बागायतदारांना आपल्या खासगी वाहनातूनच काजू विक्रीसाठी यावे लागले.