स्वामी बाबा रामदेव यांनी व्यक्त केला संकल्प
प्रतिनिधी/ डिचोली.
गोव्याचा ही परशुरामाची तसेच देवभूमी म्हणून सर्वत्र लौकीक आहे. या भूमीची ‘भोगभूमी’ अशी झालेली प्रतिमा पुसून ‘योगभूमी’ बनविण्याचा संकल्प असल्याचे योगगुरु स्वामी रामदेवबाबा यांनी स्पष्ट केले.
सिकेरी मये डिचोली येथील गोमंतक गोसेवक महासंघाच्या गोशाळेत भेट दिलेल्यानंतर स्वामी बाबा रामदेव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या राज्यात येणाऱ्या प्रत्येक पर्यटक इतरांना प्रत्येक हॉटेल, मोटेल, रेस्टॉरंटमध्ये योग व आयुर्वेदच्या विविध पद्धतींचे दर्शन व्हायला पाहिजे. त्याचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. तेव्हाच गोव्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलणार, असेही ते यावेळी म्हणाले.
आयुर्वेदातील आमची पंचमहाभुते तसेच पंचकर्म, शतकर्म यांचे दर्शन घडवित मनाच्या शांतीसाठी आध्यात्मिक पद्धतीने मार्गदर्शन करावे. त्यातून लोक आध्यात्मिकता आणि भोगाबरोबरच योग शिकणार. त्यातून हळूहळू भोगाची पातळी खाली जाऊन आणि योगाची पातळी वर येणार. त्यातूनच गोव्याची प्रतिमा भोगभूमी वरून योगभुमी होण्यास सुरुवात होईल, अशी संकल्पना बाबा रामदेव यांनी यावेळी मांडली.
एकदा माणूस योग आणि आध्यात्माकडे वळला की दारू व इतर नशेच्या गोष्टींपासून आपोआपच दूर राहणार. त्यातूनच नव्या आणि सुसंस्कृत गोव्याची ओळख निर्माण होणार, असेही बाबा रामदेव यांनी म्हटले. यावेळी आमदार प्रेमेंद्र शेट, भारत स्वाभिमानचे राज्य प्रमुख कमलेश बांदेकर, डिचोली पत्रकार संघाचे अध्यक्ष रविराज च्यारी, ज्येष्ठ पत्रकार विशांत वझे, उदय परब, विनायक सामंत, सिद्धार्थ कांबळे यांची उपस्थिती होती.