क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
राष्ट्रीय सर्फींग स्पर्धेत गोव्याच्या 15 वर्षीय शुगर बनारसेला रौप्यपदक प्राप्त झाले. महिला विभागात शुगरला हे पदक प्राप्त झाले. कॉवेलॉग क्लासिक नॅशनल सर्फ आणि एसयुपी ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा कोवळम (तामिळनाडू) येथे 9 ते 11 ऑगस्ट या कालावधीत पार पडली.
सर्फिंग खेळाला प्रथमच टोकियो ऑलिम्पिकमध्ये स्थान देण्यात आले होते. याचे महत्व लक्षात घेऊन सर्फ टर्फ आणि भारतीय सर्फिंग संघटनेतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आल्त-पर्वरी येथे राहणारी शुगर बनारसेने अनेक अनुभवी स्पर्धकांना मात देत रौप्यपदक मिळविले. या स्पर्धेत तामिळनाडूच्या डी. मणीकंदन आणि सृष्टी सेलवम यांनी अनुक्रमे पुरूष आणि महिला गटात वैयक्तिक जेतेपदे मिळविली.
मागील तीन वर्षांपासून शुगर बनारसे मोरजी येथील ऑक्टोपस सर्फ स्कूलमधून एडी रॉड्रिग्स यांच्या मार्गदर्शनाखाली सर्फिंगचे प्रशिक्षण घेत आहे. गोव्यात सर्फिंगला प्रोत्साहन देण्यासाठी 2015 मध्ये सर्फिंग स्कूलची स्थापना रॉड्रिग्स यांनी केली असून यात 16 वर्षांखालील 30 सर्फिंगपटू प्रशिक्षण घेत आहेत. शुगरने राष्ट्रीय रौप्यपदक मिळविल्याने आनंद व्यक्त केला असून ती आता पुढील स्पर्धेसाठी तयारी करत आहे.