एक वैमानिक बचावला, दुसरा बेपत्ता
प्रतिनिधी/ वास्को
भारतीय नौदलाचे एक मिग 29 के विमान गोवा जवळपासच्या खोल समुद्रात कोसळण्याची घटना गुरूवारी संध्याकाळी घडली. या घटनेत एक वैमानिक सुखरूप बचावला तर दुसरा बेपत्ता असून त्याचा शोध जारी आहे. दुर्घटनाग्रस्त विमानाने दोघा प्रशिक्षणार्थी वैमानिकांना घेऊन उड्डाण केले होते.
उपलब्ध माहितीनुसार गुरूवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. विमान कोसळण्याच्या घटनेनंतर एका वैमानिकाला सुखरूप वाचवण्यात यश आले तर दुसरा वैमानिक अद्याप बेपत्ता आहे. त्याचा शोध घेणे सुरू आहे. या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश नौदलाने दिले आहेत.
दरम्यान, वास्कोतील काही मच्छीमारांच्या वॉटस्अप ग्रुपवर बचाव कार्यात मदतीची सूचना करणारा एक संदेश शुक्रवारी संध्याकाळी उशिरा फिरत होता. हिरवा वेष आणि त्यावर नारंगी जीव रक्षक जॅकेट परिधान केलेल्या नौदलाच्या खलांशांनी विमानातून उडी घेतलेली असून हा संदेश मच्छीमारी बोटींपर्यंत पोहोचवण्यात यावा, समुद्रात लक्ष ठेवावे व बचाव कार्यात मदत पुरवावी, असे या संदेशात म्हटले आहे. हा संदेश नौदलाने प्रसारित केल्याची शक्यता आहे. मात्र, सदर विमान कुठून उडाले होते याची माहिती नौदलाने उघड केलेली नाही. यापूर्वी पेंब्रुवारी महिन्यात मिग 29 के विमान अपघातग्रस्त झाले होते.