प्रतिनिधी /पणजी
गोव्यातील अनेक भागात आज व उद्या रविवारी पावसाची शक्यता हवामान खात्याने व्याक्त केली आहे. सध्या दिवसा व सायंकाळपर्यंत हवेतील उष्णता वाढलेली असते व पहाटे पारा बराच खाली गेलेला असतो.
अशा या संमिश्र वातावरणात पावसाची भर पडणार आहे. तामिळनाडू व आंध्रप्रदेशातून पाऊस गोव्याकडे सरकला आहे. कर्नाटकातील अनेक भागात सध्या तामिळनाडू प्रमाणेच पाऊस पडत आहे. गोव्यात शुक्रवारी तापमान बरेच वाढले होते. हवामान खात्याने या अगोदरच पावसाचे वर्तमान क्यक्त केले होते. त्यानुसार आज दि. 12 तसेच उद्या रविवार दि. 13 रोजी गोव्याच्या विविध भागात मध्यम तथा हलका स्वरूपात पाऊस पडेल. काही भागात जोरदार पाऊस पडून जाण्याची शक्यता आहे. विशेषतः सत्तरी, डिचोली आणि धारबांदोडा तसेच सांगे तालुक्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी सायंकाळी ढगाळ वातावरण होते. हवामान खात्याने पावसाचे प्रमाण कदाचित दि. 14 ते 15 नोव्हें. पर्यंत तसेच राहील, असा अंदाजही व्यक्त केला आहे.