प्रतिनिधी / पणजी
राज्यात रविवारी आणि सोमवारी कोविड-19चे एकही सकारात्मक प्रकरण सापडले नसल्याने आणि त्याचबरोबर ज्या 26 व्यक्तींच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते, त्या सर्वांचे अहवाल नकारात्मक आल्याने गोव्याला पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे.
राज्यात कोविड-19चे आतापर्यंत एकूण 7 सकारात्मक व्यक्ती सापडलेल्या आहेत व त्यांना कोविड-19 च्या खास इस्पितळात ठेवण्यात आलेले आहे. राज्यात आतापर्यंत 150 हून अधिक व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आलेले आहेत ते जवळपास सर्वच नकारात्मक आहेत. याचाच अर्थ गोवा हळूहळू कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. शेजारील दोन्ही राज्यांच्या तुलनेत गोव्यात कोविड-19 संदर्भात परिस्थिती चांगली आहे व कोविड-19 मर्यादित आहे.
ज्या सातजणांना इस्पितळात ठेवण्यात आलेले आहे, त्यातील शुक्रवारी एक व शनिवारी आणखी एक कोविड-19 रुग्णाचा अहवाल सकारात्मक आला. त्यामुळे रुग्णांची संख्या सात झाली. तत्पूर्वी ज्या पाच रुग्णांना कोविड इस्पितळात ठेवण्यात आले. त्यांच्यावर उपचार चालू आहेत व त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.
गोमेकॉच्या प्रयोगशाळेत 17 नवे नमुने शनिवारी तपासणीसाठी पाठविण्यात आले, त्यांचा सर्वांचा अहवाल नकारात्मक आला आहे.