भाजप गोवा निवडणूक प्रमुख देवेंद्र फडणवीस यांची माहिती : मंत्री मायकल लोबो यांची घेतली पर्रा निवासस्थानी भेट
प्रतिनिधी /म्हापसा
आपण गोवा प्रभारी असल्याने प्रत्येक आमदारांकडे संपर्क साधून त्यांची वैयक्तिक मते जाणून घेणे आपले कर्तव्य आहे. भाजपचे प्रमुख लोक आहेत त्यांच्याकडून परिस्थिती जाणून घेऊन ठाम निर्णय घ्यायचे आहेत. मंत्री मायकल लोबो हे वरिष्ठ नेते असून त्यांचीशी चर्चा केल्यानंतरही राज्यात भाजपा सरकार पुन्हा सत्तेवर येणार हेच स्पष्ट झाले, अशी माहिती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा गोवा राज्याचे भाजपा निवडणूक प्रमुख देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
फडणवीस यांनी काल मंगळवारी कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याशी राजकीय घडामोडींवर चर्चा केली. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, गोरख मांद्रेकर, पर्राच्या सरपंच डिलायला लोबो उपस्थित होत्या. एखाद्या विषयावर चर्चा म्हणजे धुसफूस थोडीच असते. काल आमदार मंत्र्यामध्ये जी चर्चा झाली त्याला धुसफूस म्हणता येणार नाही. उलट अशा चर्चा झाल्याने एकमेकांबाबतच्या मनातील गोष्टी स्पष्ट होतात, असे फडणवीस म्हणाले.
मंत्री मायकल लोबो भाजपचे वरिष्ठ नेते
मंत्री मायकल लोबो हे वरिष्ठ नेते आहेत. स्थानिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. गोव्यामध्ये भाजपची जी परिस्थिती आहे ती पुन्हा सरकार घडवून आणण्याची आहे. त्यासाठी तळागाळातील वास्तव (ग्राऊंड रिअलिटी) समजून त्याला आकार देण्याची गरज आहे. लोबो यांच्याशी वैयक्तिकपण त्यांच्या मतदारसंघावर चर्चा झाली असून एकूण गोवा म्हणूनही त्यांच्याशी आपली खूप चांगली चर्चा झाली, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील आघाडी अनैसर्गिक
महाराष्ट्रात 3 पक्षाची आघाडी आहे ती अनैसर्गिक. अशा प्रकारची आघाडी कधी चालूच शकत नाही. त्यात नैसर्गिक काहीच नाही. अनैसर्गिक आघाडी कधीच चालू शकत नाही. महाराष्ट्रात महापालिकेच्या निवडणुका व्हायलाच पाहिजे असा आमचा आग्रह आहे.
गोव्याच्या हितासाठी झाली चर्चा : लोबो
पत्रकारांशी बोलताना मंत्री मायकल लोबो म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी आपली भेट घेतली. आपण दोघांनी लोकांच्या हितासाठी आणि गोवा राज्याच्या हितासाठी चर्चा केली. गोव्याच्या हितासाठी आम्ही काम करायला पाहिजे. नागरिकांच्या ज्या मनातील गोष्टी आहेत त्या आम्ही पुढे आणायला पाहिजे, असे आपण त्यांना सांगितल्याचे लोबो यांनी पत्रकारांना सांगितले.
डिलायला लोबोंच्या उमेदवारीबाबत दिली माहिती
आपली पत्नी तथा पर्राच्या सरपंच डिलायला लोबो 2022 च्या निवडणुकीमध्ये शिवोली मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे आपण फडणवीस यांना सांगितले आहे. मात्र ते सकारात्मक वा नकारात्मक असे काहीच बोलले नाही.
राज्यात विविध पक्ष येणारच, आता तृणमूल पक्षही राज्यात प्रवेश करीत आहे. ममता बॅनर्जी मुख्यमंत्री आहेत, त्याही गोव्यात येणार. प्रत्येक पक्ष आणि ज्यांना गोव्यात रस आहे ते राज्यात येणार व प्रचार करीत आपल्या पक्षाला निवडून आणा असे घरोघरी जाऊन स्पष्ट करणार आहेत. केजरीवाल आपल्यास भेटायला पाहत होते, मात्र ऍपॉईंटमेंट झाला नाही, अशी माहितीही मंत्री लोबो यांनी दिली.
डॉ. प्रमोद सावंत सक्षम मुख्यमंत्री
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाजी आणि त्यासोबत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या दोघांचे भाषण ऐकले असेल तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत येत्या 2022 च्या निवडणुकीत नक्कीच सक्षम ठरणार आहेत, अशी माहिती यावेळी पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री 2022 च्या निवडणुकीत सक्षम नेतृत्व म्हणून पाहता काय असे फडणवीस यांना विचारले असता त्यांनी वरील माहिती दिली.