पाच हजार कोटीची गुंतवणूक : 1400 जणांना मिळणार रोजगार,उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांचा दावा
प्रतिनिधी /पणजी
नवीन उद्योग धोरणास अनुसरून आणि त्यास प्रतिसाद म्हणून 20 उद्योगांना काम सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यात सुमारे रु. 5000 कोटीची गुंतवणूक समाविष्ट आहे. एकूण 1400 जणांना तेथे रोजगार मिळणार असल्याचा दावा उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी केला आहे. सदर उद्योग सुरू करणाऱया कंपन्यांना ‘गुंतवणूक गोवा 2022’ (इनव्हेस्ट गोवा) या परिषदेत तशी पत्रे देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पणजीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, गोवा हे जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असून देशी विदेशी पर्यटक, पर्यटक-गुंतवणूकदार येतात. त्यांनी गोव्यात पर्यटनासाठी यावे, येथे राहावे आणि सोबत गुंतवणूक करावी. गोव्याच्या अर्थव्यवस्थेस हातभार लावावा. त्यातून रोजगाराच्या संधी प्राप्त होतील. अशी उद्योग धोरणाची संकल्पना आहे. गोव्यात पर्यावरण पूरक उद्योगांना प्राधान्य देण्यात येत असून नवीन धोरणानंतर मिळालेला हा 20 उद्योगांचा प्रतिसाद उत्साहवर्धक असल्याचे गुदिन्हो यांनी नमूद केले.
तीन विदेशी कंपन्यांचा समावेश!
गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने त्या 20 उद्योगांना मंजुरी दिली असून त्यांना आता होकारपत्रे देण्यात येतील. सदर उद्योगात दोन अमेरिकन आणि एक डच अशा एकूण 3 विदेशी कंपन्यांचा समावेश आहे. गोवा हे लॉजिस्टिक हब करण्याचा इरादा असून दाबोळी आणि मोपा अशा दोन विमानतळांमुळे गोव्यातील उद्योगांना मोठा फायदा होणार आहे. गुंतवणुकीसाठी गोव्याला आता खूप महत्त्व आले असून मोपा विमानतळ सुरू झाल्यानंतर ते महत्त्व आणखी वाढणार आहे. गोव्यात जास्तीतजास्त उद्योग यावेत, यासाठी सरकार प्रयत्नशील असून त्याद्वारे बेकारांना रोजगार मिळवून देण्यात येणार असल्याचे मंत्री गुदिन्हो यांनी नमूद केले.
गोव्यात उद्योग वाढावेत म्हणून गोवा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे योगदान मोलाचे असून त्यांनी देखील उद्योग वाढीसाठी पुढाकार घ्यावा, असेही मंत्री गुदिन्हो म्हणाले. गोवा चेंबर्सचे अध्यक्ष राल्फ डिसोझा व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.