दर दिवशी 458 कोटींची भर :कंपनीच्या शेअर्सनी दिला 552 टक्क्यांचा भक्कम परतावा
वृत्तसंस्था/ मुंबई
अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांचे नाव आज उद्योगजगतात अग्रक्रमाने घेतले जात आहे. यावषी प्रति दिवसाची कमाई पाहता प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी व बिल गेट्स यांना मागे टाकण्यात गौतम अदानींना मोठे यश आले आहे. ब्लूमबर्ग बिलिनियर्स इंडेक्स 2020 मध्ये अदानी यांचे उत्पन्न 183 टक्के वाढल्याचे दिसून आले आहे.
त्याचप्रमाणे कंपनीच्या समभागांनी शेअर बाजारात गुंतवणूकदारांना दणकेबाज परतावाही दिला आहे. कंपनीच्या समभागांचे भाव 552 टक्के वाढले आहेत. अदानींच्या समभागातील अत्युच्च तेजी व चांगल्या तिमाहीच्या कामगिरीच्या जोरावर कंपनीने यावषी व्यवसायात उंच झेप घेतली आहे.
जानेवारी ते नोव्हेंबरच्या कालावधीत अदानी यांचे उत्पन्न वाढून 2.35 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच अदानी यांनी दरदिवशी 458 कोटी रुपये कमावले आहेत. जगातील क्रमवारीत 41 व्या स्थानावर व देशातील क्रमवारीत दुसरे श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांनी नाव कमावले आहे.
बाजारात भांडवलात उत्तम वाटा
स्थानिक बाजारात अदानी ग्रुपच्या 6 कंपन्या लिस्टेड आहेत. अदानी एंटरप्राईझेस 1994 मध्ये लिस्टींग झाली. अदानी एंटरप्राईझेसच्या वेगवेगळय़ा कंपन्या शेअर बाजारात लिस्टिंग झाल्या. ग्रुपच्या 6 कंपन्यांपैकी अदानी ग्रीन एनर्जीचे बाजार भांडवल सर्वाधिक 1.75 लाख कोटी रुपये इतके झाले. जानेवारीपासून आतापर्यंत कंपनीच्या समभागाने गुंतवणूकदारांना चक्क 552 टक्के इतका अत्युत्तम परतावा दिला आहे. त्यांचे बाजारातील भांडवल 3.97 लाख कोटी रुपये इतके होते. बीएसई निर्देशांकात एकूण भांडवलात अदानी ग्रुपची हिस्सेदारी 2.27 टक्के इतकी आहे.
डीएचएफएलसाठी बोली वाढवली
संकटात सापडलेल्या डीएचएफएल कंपनीच्या मदतीसाठी अदानी समूहाने आपला हात पुढे केला आहे. गृहकर्ज क्षेत्राशी निगडित डीएचएफएल कंपनीच्या बोलीसाठी अदानी समूहाने अधिक रस दाखवला आहे. कंपनीने आपल्या बोलीत वाढ केली असल्याचे सांगण्यात येते. पूर्वीच्या तुलनेमध्ये आता 33 हजार कोटींची बोली अदानी समूहाकडून लावली जाणार असल्याचे सांगितले जाते. डीएचएफएलसाठी ओक ट्रीने 28 हजार 300 कोटी आणि पिरामल समूहाने 23 हजार 500 कोटींची बोली लावली होती. तेव्हा हे पाहता बोलीत अदानी समूहच वरचढ असल्याचे दिसते आहे.