ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. गुरुवारी उच्च न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीत दिल्ली सरकारच्या ‘ड्रग कंट्रोलर’ने गौतम गंभीर फाऊंडेशनला कोविड 19 औषधांची अवैध साठेबाजी आणि वितरण प्रकरणात दोषी आढळले असल्याचे सांगितले आहे.
‘ड्रग कंट्रोलर’ने न्यायालयात सांगितले की, कोविड 19 रुग्णांच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या फॅबिफ्लू या औषधांची अनधिकृतरित्या साठेबाजी, खरेदी आणि विक्री प्रकरणात गौतम गंभीर फाऊंडेशन दोषी आढळले आहे. त्यामुळे या प्रकरणात फाउंडेशन आणि औषध विक्रेत्यांविरुद्ध लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी.
ड्रग्स आणि कॉस्मेटिक्स’ कायद्यांतर्गत आमदार प्रवीण कुमार हे देखील अशाच प्रकारच्या गुन्ह्यात दोषी आढळले आहेत, अशी माहितीही औषध नियंत्रकांनी उच्च न्यायालयात दिली आहे.
औषध नियंत्रकांनी या प्रकरणाच्या सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश देतानाच उच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 29 जुलै रोजी निर्धारित केली आहे.