पेठ वडगाव / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील नव्याने निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन शिवसेना संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर यांनी दिल्या. ते पेठवडगाव येथे शिवसेनेच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यात बोलत होते.
यावेळी माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर बोलताना म्हणाले, गाव पातळीवर शक्य असेल त्या ठिकाणी स्वतंत्र अथवा स्थानिक आघाडी करून निवडणूक लढवावी व जास्तीत जास्त शिवसेनेचे सदस्य व सरपंच निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर शिवसेनेत राहून २०१९ च्या विधानसभेवेळी ठराविक शिवसैनिकांनी शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात उघड प्रचार केला. शिवसेनेत कट्टर शिवसैनिकाला सांगावं लागतं नाही की कोणाला मतदान करावे, दगड जरी उभा केला तरी त्याला मतदान करतात असे आम्ही पूर्वी म्हणायचो, पण दुर्दैवानं काही ठराविक शिवसैनिकांनी दुसर्या पक्षाच्या उमेदवाराचा त्यांच्या स्टेजवरून प्रचार केला. शिवसेनेच्या पदाचा गैर उपयोग केला.
तसेच हकालपट्टी केलेल्या बंडखोरांना पुन्हा पक्षात घ्यायचच असेल तर स्थानिक खासदार व आमदारांना व प्रमुख पदाधिकाऱ्यांना बरोबर घेवून बैठक करावी व पक्षप्रवेश करणाऱ्यांकडून पक्षाशी प्रामाणिक राहण्या संदर्भात आश्वासन घेण्यात यावे अशी मागणी करत विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी गद्दारी करत विरोधकांचा प्रचार केलेल्या पदाधिकाऱ्यावर निशाना साधला.
यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर, माजी आमदार सत्यजित आबा पाटील , जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, जिल्हा महिला प्रमुख मंगलताई चव्हाण, सर्व महिला तालुकाप्रमुख युवासेना युवा अधिकारी उपतालुका विभाग प्रमुख व शिवसैनिक उपस्थित होते.