शिवसेनेचा नगराध्यक्षांवर पलटवार
सावंतवाडी / वार्ताहर:
सावंतवाडी शहरातील नागरिकांवर आर्थिक भुर्दंड पडू नये, यासाठी आम्ही शिवसेनेचा काळात बबन साळगावकर नगराध्यक्ष असताना घरपट्टी वाढवू नये, असा ठराव झाला होता. तसेच सहा महिन्यापूर्वी आम्ही सर्वानी कुठलीही वाढ करू नये, असा एकमुखी ठराव घेतला असताना नगराध्यक्ष संजू परब यांनी वाढीव घरपट्टीबाबत विशेष सभा घेण्याचे प्रयोजनच काय. निवडणुका डोळय़ासमोर ठेवून नगराध्यक्ष परब व भाजपचा जनतेची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका शिवसेनेचे नगरसेवक तथा शहरप्रमुख बाबू कुडतरकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
आम्ही निवडणूक डोळय़ासमोर ठेवून काही करत नाही. तर नेहमीच सावंतवाडीकर जनतेसोबत आहोत. आमदार दीपक केसरकर यांनी करोडो रुपयांचा निधी शहराच्या विकासासाठी दिला आहे. मग गेल्या दोन वर्षात नगराध्यक्ष परब यांनी भाजपच्या माध्यमातुन शहरासाठी किती निधी दिला हे त्यांनी सांगावे, असे आव्हानही कुडतरकर यांनी दिले.