सेन्सेक्स व निफ्टी 9 अंकांनी वधारले :एचडीएफसी तेजीत
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशी मंगळवारी प्रारंभी शेअर बाजाराने आपटी खाल्ली होती. त्यानंतर दिवसअखेर शेअर बाजार सावरत तेजीची झुळूक प्राप्त करत बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे. दिवसभरातील प्रमुख कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँक आणि एचसीएल यांच्या समभागांच्या बळकटीने शेअर बाजाराने गमावलेली तेजी परत मिळवत नवा विक्रम प्राप्त केला आहे.
दिग्गज कंपन्यांमधील कामगिरीनंतर दिवसअखेर सेन्सेक्स 9.71 अंकांनी वधारुन निर्देशांक 46,263.17 वर बंद होत नवीन विक्रम प्राप्त केला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 9.70 अंकांनी वधारुन निर्देशांक 13,567.85 वर स्थिरावला आहे.
प्रमुख कंपन्यांनी केलेल्या नफा कमाईच्या जोरावर बजाज फायनान्सचे समभाग सर्वाधिक पाच टक्क्यांनी मजबूत स्थितीत राहिले आहेत. सोबत बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी, टेक महिंद्रा, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट आणि टाटा स्टीलचे समभाग नफा कमाईसह बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला हिंदुस्थान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस बँक, स्टेट बँक, टीसीएस आणि आयटीसी यांचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले आहेत.
जीडीपी अंदाजाचा प्रभाव
एस ऍण्ड पी या ग्लोबल रेटिंग्स संस्थेकडून चालू आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक वृद्धीदर हा पहिल्यांदा निश्चित केलेल्या अंदाजापेक्षा सुधारणार असल्याचे नेंदवले आहे. पहिल्यांदा हा अंदाज 9 टक्क्यांनी घसरणीत राहणार असल्याचे म्हटले होते. परंतु यामध्ये सुधारणा होत हा दर वजा 7.7 टक्के राहणार असल्याचे एस ऍण्ड पीने स्पष्ट केले आहे. या अंदाजामुळे भारतीय भांडवली बाजाराकडे गुंतवणूकदारांनी सकारात्मक कलाने पाहिल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
विदेशी मुद्रा विनिमय बाजारात मात्र रुपया आठ पैशानी घसरुन 73.63 रुपये प्रति डॉलरवर राहिला.