काकोडकर यांच्या साहित्यावर मडगावात व्याख्यान : गोमंतक साहित्य सेवक मंडळातर्फे आयोजन
सांस्कृतिक प्रतिनिधी /फोंडा
गोमंतकीय सिद्धहस्त लेखक आणि कादंबरीकार चंद्रकांत काकोडकर यांनी आपल्या लेखणीच्या बळावर समाज जागृती केली. ‘गोमंतक जागा हो’ कादंबरीच्या माध्यमातून त्यांनी तरुणाईला स्फूर्ती दिली. पोर्तुगीजांविरुद्धच्या लढय़ात अहिंसेच्या माध्यमातून गोवा मुक्त होणार नाही तर त्यासाठी सशस्त्र लढा उभारावाच लागेल, हा संदेश त्यांनी त्याकाळच्या गोमंतकाभिमानी युवकांना दिला. स्व. काकोडकरांची ग्रंथसंपदा विपुल असून वास्तववादी लिखाणावर त्यांनी अधिक भर दिला, अशी माहिती वाङ्मय अभ्यासक ऍड. राजीव शिंक्रे यांनी दिली.
‘गोमंतकीय उपेक्षित कादंबरीकार चंद्रकांत काकोडकर’ या विषयावर व्याख्यान देताना ऍड. शिंक्रे यांनी काकोडकरांच्या साहित्यावर विशेष भाष्य केले. मडगाव येथील गायतोंडे वाचनालयाच्या सभागृहात चंद्रकांत काकोडकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गोमंतक साहित्य सेवक मंडळ या आयोजक संस्थेचे अध्यक्ष रमेश वंसकर, डॉ. उदय गावकर, उल्हास गायतोंडे तसेच प्रकाश तळवडेकर तसेच जनार्दन वेर्लेकर उपस्थित होते. स्त्री-पुरुष संबंध आणि प्रेम या विषयावर मुक्तपणे लिहिण्याचे धाडस त्यांनी त्या काळात केल्याने त्यांच्यावर अनेक प्रसंग ओढवले. परिणामी ‘शामा’ या त्यांच्या कादंबरीवर अश्लीलपणाचा आरोप ठेवून बंदी घालण्यात आली परंतु सर्वोच्च न्यायालयात त्यांना न्याय मिळाला. त्यांच्या कितीतरी कादंबरींचा अनुवाद, चित्रपटकथा यासाठी वापर झाला. साहित्यक्षेत्रात त्यांचा उपहासही झाला परंतु कसदार कादंबरींची निर्मिती करून त्यांनी साहित्यामध्ये सकारात्मक भर टाकला, असेही ऍड. राजीव शिंक्रे म्हणाले.
यावेळी शिक्षण खात्याचे उपसंचालक डॉ. उदय गावकर यांच्याहस्ते पुष्पा गायतोंडे व शोभा धामस्कर यांना गौरविण्यात आले. रमेश वंसकर यांनी स्वागत केले. प्रसाद सावंत यांनी सूत्रसंचालन केले तर पुष्पा गायतोंडे यांनी आभार मानले.