अमित शाह यांच्यासोबत तेदेप प्रमुखांनी केली चर्चा : भाजप अध्यक्ष नड्डा देखील उपस्थित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2024 च्या लोकसभा निवडणुकीकरता सर्वच राजकीय पक्षांनी स्वत:चे राजकीय डावपेच सुरू केले आहेत. रालोआला तिसऱ्यांदा सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी विरोधी पक्षांच्या एकजुटतेची चर्चा जोर पकडू लागली असताना भाजपने देखील स्वत:च्या जुन्या सहकाऱ्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न चालविले आहेत. याचनुसार तेलगू देसम पक्षाचे प्रमुख तसेच आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा झाली आहे. या बैठकीला भाजप अध्यक्ष जगतप्रकाश न•ा देखील उपस्थित होते.
सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत चालू वर्षाच्या अखेरीस तेलंगणात होणारी विधानसभा तसेच पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवरून तसेच आंध्रप्रदेश विधानसभा निवडणुकीवरून चर्चा झाल्याचे समजते. यंदा होणाऱ्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजप अन् तेदेप यांच्यात आघाडी होण्याची दाट शक्यता आहे.
जुने सहकारी आहेत नायडू
चंद्राबाबू नायडू यांचा तेदेप हा 2014 मध्ये रालोआत सामील होता. परंतु मार्च 2018 मध्ये आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून तेदेपने रालोआतून काढता पाय घेतला होता. परंतु पोर्ट ब्लेयर महापालिका निवडणुकीत भाजप अन् तेदेप एकत्र आले होते. अलिकडेच ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेदेपचे संस्थापक आणि अविभाजित आंध्रप्रदेशचे तीनवेळा मुख्यमंत्री राहिलेले एन.टी. रामा राव यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा विशेष उल्लेख केला होता.
भाजपसोबत जुळवून घेणार
चंद्राबाबू नायडू हे मागील काही काळापासून भाजपसोबतचे संबंध सुधारण्याची इच्छा बाळगून असल्याचे संकेत देत आहेत. एप्रिल महिन्यात नायडू यांनी पंतप्रधान मोदी यांना दूरदर्शी ठरवत ते देशाची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी काम करत असल्याचे उद्गार काढले होते. पंतप्रधान मोदींच्या राष्ट्रउभारणी प्रक्रियेत सामील होऊ इच्छितो असेही त्यांनी म्हटले होते.
भाजपला सहकाऱ्यांची गरज
कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयानंतर भाजपला दक्षिणेतील राज्यांमध्ये स्वत:चा प्रभाव वाढविण्यासाठी नव्याने विचार करावा लागत आहे. याचमुळे जुन्या सहकाऱ्यांना आघाडीत पुन्हा सामील करण्याचे त्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल ठरू शकते. नायडू अन् शाह यांच्यातील चर्चेत नेमके कुठल्या मुद्द्यावर बोलणे झाले याची माहिती समोर आलेली नाही. परंतु या भेटीला दीर्घकाळानंतर राजकीय संबंध सुधारण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच नायडू यांनी भाजपसोबतची आघाडी तोडली होती. त्यानंतर नायडू आणि शाह यांच्यातील ही पहिलीच भेट आहे. नायडू हे सध्या जी-20 बैठकीकरता दिल्लीत असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेऊ शकतात.
आघाडीसाठी प्रयत्नशील
तेदेपचे माजी खसदार सी.एम. रमेश आणि सुजाना चौधरी सध्या भाजपसोबत आहेत. हे दोन्ही नेते भाजप अन् तेदेप यांच्यात आघाडी व्हावी म्हणून प्रयत्नशील आहेत. आंध्रप्रदेशसोबत तेलंगणात होणारी विधानसभा निवडणूकही दोन्ही पक्ष एकत्रितपणे लढवू शकतात. नायडू यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे काही वरिष्ठ नेते देखील या बैठकीत सामील झाले होते. आंध्रप्रदेशातील पवन कल्याण हे देखील तेदेप अन् भाजपने एकत्र यावे यासाठी आग्रही होते.
आंध्रप्रदेशातही निवडणूक
नायडू हे आंध्र्रप्रदेशातील सत्तेपासून दूर आहेत. राज्यात वायएसआर काँग्रेसला पराभूत करण्यासाठी तेदेपला भाजपची मदत घ्यावी लागणार आहे. तर वयएसआर काँग्रेससोबत भाजपचे संबंध मधूर असल्याचे मानले जाते. 2019 च्या निवडणुकीनंतरच नायडू यांनी भाजपसोबतचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न चालविला होता. अमित शाह यांची 8 जून रोजी विशाखापट्टणम येथे जाहीर सभा होणार आहे. तर 10 जून रोजी नड्डा हे तिरुपति येथे असणार आहेत.