गरमागरम समोसा म्हटला की तोंडाला पाणी सुटतं. समोसा न आवडणारी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. समोसा आपल्या खाद्यसंस्कृतीत इतका मिसळला आहे की तो आपलाच वाटतो. पण प्रत्यक्षात समोसा या पदार्थाचा उगम भारतातला नाही. तो चौदाव्या शतकात मध्य-पूर्वेतून भारतात आला आणि भारतातलाच झाला. बटाटय़ापासून समोस्याचं सारण तयार केलं जातं. मात्र तुम्ही वेगवेगळ्या घटकांचा, पदार्थांचा वापर करून सारण तयार करू शकता. समोस्यात काहीही घालता येईल. इतक्या वेगवेगळ्या पद्धतींनी समोसा करता येईल की की खाणारा कंटाळेल पण वैविध्याची यादी संपणार नाही. त्यापैकीच ही एक रेसिपी…
साहित्य – सारणासाठी 1 टेबलस्पून तेल, अर्धा टी स्पून जिरं, बारीक चिरलेला एक चतुर्थांश कांदा, बारीक चिरलेली एक चतुर्थांश ढोबळी मिरची, एक टी स्पून आमचूर पावडर, एक टीस्पून लाल तिखट, एक कप अत्यंत बारीक चिरलेलं पनीर, बारीक चिरलेली दोन टेबलस्पून कोथिंबीर, सर्व्ह करण्यासाठी पुदिना चटणी. समोस्याची पारी बनवून घ्यावी. कृती- एका पसरट भांडय़ामध्ये तेल घ्या. मंद आचेवर तेल तापल्यानंतर त्यात जिरं टाका. जिरं तडतडल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा, आलं-हिरव्या मिरचीची पेस्ट लालसर रंगावर परतून घ्या. त्यानंतर त्यात ढोबळी मिरची, आमचूर पावडर, लाल तिखट, पनीर आणि कोथिंबीर टाकून मध्यम आचेवर परतून घ्या. परतून झाल्यावर हे मिश्रण गॅसवरून खाली उतरवा आणि थंड होण्यासाठी ठेवा. या सारणाचे आठ समान भाग करा. थंड झाल्यानंतर समोस्याची पारी घ्या. समोस्याची पारी समतल भागावर ठेवा आणि एका बाजूने त्यात एक भाग सारण भरा. सारण भरून झाल्यानंतर त्याचं दुसरं टोक त्रिकोणी घडीमध्ये दुमडून घ्या. दुमडलेल्या टोकाला पाण्याचा हात लावून इतरही सर्व टोकं त्रिकोणाच्या आकारात एकमेकांना चिकटवून घ्या. अशा प्रकारे सारणाचे सातही भाग इतर पारींमध्ये भरून घ्या. एका कढईमध्ये तेल गरम करून घ्या. तेल तापल्यानंतर त्यात समोसे सोडा आणि रंग लालसर होईपर्यंत तळून घ्या. त्यातले जास्तीचं तेल टिपकागदाने शोषून घ्या. पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.