प्रतिनिधी/ बेळगाव
शहरात दुचाकी आणि चार चाकी वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यामुळे पार्किंग समस्येची डोकेदुखी वाढत चालली आहे. महापालिकेकडे दोन ठिकाणी पार्किंग सुविधा उपलब्ध आहे. अन्य दोन ठिकाणी नव्याने पार्किंग सुविधा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे चार ठिकाणी पार्किंग शुल्क आकारणीसाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली आहे.
सध्या बापट गल्लीत एकमेव ठिकाणी चार चाकी वाहनांसाठी पार्किंग सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. पण वाढती वाहनसंख्या पाहता बापट गल्लीतील पार्किंग तळ अपुरे पडू लागले आहे. त्यामुळे शहरातील विविध रस्त्यांवर चार चाकी वाहने पार्क करण्यात येत आहेत. महापालिकेने वाहनतळ उपलब्ध करण्याच्यादृष्टीने कोणत्याच उपाययोजना राबविल्या नाहीत. त्यामुळे प्रत्येक रस्त्यावर दुचाकी वाहने पार्क केली जातात. मुबलक पार्किंग सुविधा उपलब्ध नसल्याने दुचाकी आणि चार चाकी वाहने हव्या त्या ठिकाणी पार्क करण्यात येत असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. बापट गल्लीत बहुमजली पार्किंगतळ उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला होता. पण हा प्रस्ताव बासनात पडला आहे. त्यामुळे पार्किंग प्रश्न जैसे थे असल्याने शहरवासियांची डोकेदुखी वाढली आहे.
खंजर गल्ली येथील लक्ष्मी मार्केटच्या ठिकाणी वाहनांसाठी पार्किंगतळ निर्माण करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून चार वर्षे उलटली. पण अद्यापही पार्किंगसाठी जागा उपलब्ध करण्यात आली नाही. जिल्हा रुग्णालयासमोरील मनपाच्या खुल्या जागेत चार चाकी वाहनांसाठी पार्किंगतळ निर्माण करून शुल्क आकारणी करण्यात येत आहे. त्यामुळे शहरात पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. महापालिकेच्यावतीने आता दोन ठिकाणी नव्याने पार्किंग सुविधा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये खंजर गल्ली येथील पार्किंगतळ खुले करून देण्यासह लिंगराज कॉलेजसमोरील पोलीसलाईनच्या शेजारी पार्किंगतळ सुरू करण्यात येणार आहे. बापट गल्ली, जिल्हा रुग्णालयासमोरील पार्किंगतळ, खंजर गल्ली आणि लिंगराज कॉलेजच्या समोरील पोलीस लाईनजवळच्या जागेतील पार्किंग शुल्क आकारणीसाठी निविदा काढण्यात येणार आहे. ही प्रक्रिया मागील सहा महिन्यांपासून सुरू असून निविदा काढण्यास महापालिकेला मुहूर्त मिळाला नव्हता, असे निदर्शनास आले आहे. पण सर्व ठिकाणी पार्किंग सुविधा उपलब्ध करण्यासाठी अलीकडेच निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. चार ठिकाणी पार्किंग शुल्क आकारणीकरिता निविदा मागविण्यात आली असून दि. 15 सप्टेंबरपर्यत निविदा भरण्याकरिता मुदत देण्यात आली आहे. सध्या महापालिकेच्या कर्मचाऱयांकरवी पार्पिंग शुल्क आकारणी करण्यात येते. पण निविदा प्रक्रियेत कंत्राटाची नियुक्ती झाल्यास मनपा कर्मचाऱयांवरील जबाबदारी कमी होणार आहे.