प्रतिनिधी / इचलकरंजी
शहरालगतच्या चंदूर ता. हातकणंगले येथील एका चार वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिला विहिरीत ढकलून दिल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना रविवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास घडली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत मृत बलिकेच्या आईने पोलिसात तक्रार दिली आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, खाऊचे आमिष दाखवून शेजारीच राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांनी त्या चिमुकलीला घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतात नेले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर बालिकेला शेजारील पडीक विहिरीत ढकलून दिले. दरम्यान, सांयकाळ नंतर बालिकेचा शोध घेतला असता तिचा मृतदेह विहिरीत आढळून आला. यावेळी नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवून टाकणारा होता. मृतदेह विहिरी बाहेर काढून लिंगायत स्मशानभूमीत दफन करण्यात आले.
दरम्यान, याबाबत बालिकेच्या नातेवाईकांना शंका आल्याने त्यांनी शोध घेण्यात सुरुवात केली. विहिरीच्या मार्गावरील असणाऱ्या एका यंत्रमाग कारखान्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची फुटेज पाहिले असता एक अल्पवयीन मुलगा बालिकेला घेऊन जात असल्याचे दिसून आले. यानंतर त्याच्याकडे नातेवाईकांनी चौकशी केली. मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. ही माहिती शिवाजीनगर पोलिसांना सांगितली. पोलिसांनी अल्पवयीन मुलाकडे चौकशी केली असता त्याने साथीदारासह गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.