ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यातच आपल्या जीवाची पर्वा न करता कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये देखील कोरोना झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 247 पोलिसांना कोरोनाची लागण झाली तर 2 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर आतापर्यंत 20 हजार 003 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत 204 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आढळलेल्या 20,003 कोरोनाबाधित पोलिसांमध्ये 2163 पोलीस अधिकारी आणि 17,840 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 16 हजार 071 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 1696 पोलीस अधिकारी आणि 14,375 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सद्यस्थितीत राज्यात 3728 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 447 पोलीस अधिकारी आणि 3281 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 204 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 20 पोलीस ऑफिसर आणि 184 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.