आज आपल्या आयुष्यातले ताणतणाव प्रचंड वाढले आहेत. दर पाचपैकी एका व्यक्तीला तणावाने घेरलं आहे. काही कृती करून हा ताण कमी करता येईल. तुम्हीही ताणतणावाला सामोरं जात असाल तर या टिप्स तुमच्या उपयोगी पडतील.
- घरातलं फर्निचर स्वच्छ करणं किंवा फर्निचरची जागा बदलण्यासारखी कामं तुम्हाला करता येतील. अशी कामं करताना तुम्हाला आयुष्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन मिळू शकतो. काही समस्यांवर उपायही मिळू शकतो.
- हिरव्या पालेभाज्या निवडून स्वच्छ करण्यासारखे उपाय ताणतणावांना दूर ठेऊ शकतात. यामुळे तुमच्या मनातले विचार बदलू शकतात.
- घरी असताना चिंता, काळजी सतवायला लागल्यावर कपाट आवरायला घ्या. कपाट आवरताना तुमच्या मनातले वाईट विचार दूर होतील आणि कपाटही नीटनेटकं होईल.
- तुमचे ईयरफोन एकमेकांमध्ये गुंतत असतील. मनात चिंतेचे ढग दाटू लागल्यावर या ईयरफोनचा गुंता सोडवा. हा गुंता सोडवताना तुमच्या मनातला विचारांचा गुंताही सुटू लागेल.
- तुम्ही तुमचा डेस्क आवरायला घ्या. घाण आणि अव्यवस्थित डेस्कमुळे तुमच्या उत्पादनक्षमतेवर परिणाम होतो. नको असणार्या वस्तू डेस्कवर ठेऊ नका. धूळ, घाण स्वच्छ करा. यामुळे तुमच्या मनातली चिंताही दूर होऊ शकेल.