आयपीएलशी व्हिवोचा करार रद्द करण्यासाठी वाढता दबाव
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गलवान खोऱयातील संघर्षानंतर चिनी उत्पादने, प्रायोजकांवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत असली तरी बीसीसीआयला आयपीएलचे प्रायोजक व्हिवो कंपनीशी असलेला करार एका झटक्यात तोडून टाकणे शक्य होणार नाही, असे संकेत आहेत. व्हिवो व आयपीएल यांच्यात झालेल्या करारात नमूद असलेले ‘एक्झिट क्लॉज’ व्हिवो कंपनीला पूरक ठरेल व याच तरतुदीमुळे बीसीसीआय हा करार रद्द करु शकणार नाही, असे प्राथमिक चित्र आहे.
पूर्व लडाखमध्ये 15 जून रोजी झडलेल्या संघर्षानंतर केंद्र सरकारने चीनच्या 59 ऍपवर बंदी घातली. यात वादग्रस्त टिकटॉक ऍपचा प्राधान्याने समावेश राहिला. त्यानंतर बीसीसीआयने आयपीएल प्रायोजक कंपनी व्हिवोशी असलेल्या करारावर फेरविचार केला जाईल, असे म्हटले होते.
‘टी-20 विश्वचषक व आशिया चषक स्पर्धेबाबत अद्याप चित्र स्पष्ट नाही. त्यामुळे, आता बैठक घेण्यात काहीही हशील नाही. प्रायोजकत्वाबद्दल चर्चा करावी लागेल. मात्र, हा करार रद्द केला जाईल किंवा वगळला जाईल, असे आम्ही कुठेही म्हटलेले नाही’, असे आयपीएल कार्यकारिणीच्या बैठकीत स्थान असलेल्या बीसीसीआयमधील एका सूत्राने नमूद केले.
‘प्रायोजकतेवर फेरविचार करु, ही आमची भूमिका आहे. फेरविचार याचा अर्थ असा की, आम्हाला करारातील अटी व तरतुदी अभ्यासाव्या लागतील. जर ‘एक्झिट क्लॉज’ची तरतूद व्हिवोला लाभदायी असेल तर वर्षामागे 440 कोटी रुपयांचा असलेला करार आम्ही कसा रद्द करणार? जर सदर एक्झिट क्लॉज आमच्यासाठी अनुकूल असेल तरच हा करार रद्द केला जाईल’, असे या सूत्राने गोपनियतेच्या अटीवर पुढे नमूद केले.
सध्याच्या परिस्थितीत व्हिवोला हा करार कायम ठेवण्याची इच्छा नसेल तरच तो रद्द करा, अशी बीसीसीआयमधील काही पदाधिकाऱयांची सूचना आहे. व्हिवोला हा करार कायम ठेवायचा असेल तर मात्र 2022 पर्यंत व्हिवो हेच आयपीएलचे प्रायोजक राहतील, असे एकंदरीत चित्र आहे. निम्म्यातच करार मोडला तर बीसीसीआयने व्हिवोला नुकसानभरपाई देणे बंधनकारक असणार आहे आणि सध्याच्या स्थितीत तातडीने दुसरा प्रायोजक मिळेल, याची खात्री देता येणे कठीण आहे.
आयपीएल कार्यकारिणी बैठकीबद्दल अद्याप ठोस निर्णय नाही
सध्याच्या तणावपूर्ण स्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रायोजकत्वाबाबत फेरविचार करण्यासाठी पुढील आठवडय़ात कार्यकारिणी बैठक आयोजित केली जाईल, असे आयपीएलने आपल्या ट्वीटरवर दि. 19 जून रोजी जाहीर केले होते. पण, दोन आठवडय़ांचा कालावधी उलटला तरी या बैठकीची तारीखही निश्चित झालेली नाही. ‘ट्वीट पाहिल्यानंतर मी आयपीएल अध्यक्ष ब्रिजेश पटेल व सीईओ राहुल जोहरी यांच्याशी संपर्क साधला. पण, ही बैठक केव्हा होईल, याबाबत आतापर्यंत मला कोणीही काहीही कळवलेले नाही. माझ्या मते, आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेचा निर्णय झाल्यानंतरच सदर बैठक आयोजित केली जाईल’, असे एका अनुभवी कार्यकारिणी सदस्याने यावेळी नमूद केले.
यंदाची आयपीएल स्पर्धा फक्त मुंबईत?
यंदाच्या आयपीएल स्पर्धेसाठी ‘एक शहर, एक स्पर्धा’, असा नवा पर्याय आयपीएलशी संलग्न असलेल्या काही घटकांनी सूचवला असून यानुसार ऑक्टोबरमध्ये फक्त मुंबई शहरातच यंदाची आयपीएल स्पर्धा भरवावी, असा त्याचा आशय आहे. अर्थात, यासाठी मुंबईवरील कोरोनाचे संकट दूर झालेले असणे सर्वात महत्त्वाचे ठरणार आहे. मुंबईतील फ्लडलाईटची चार मैदाने असून त्यापैकी वानखेडे, ब्रेबॉर्न व डीवाय पाटील स्टेडियम या तीन ठिकाणी यापूर्वी आयपीएलचे सामने झाले आहेत. याशिवाय घनसोळी येथील रिलायन्स मैदानावरही आयपीएलचे सामने भरवले जाऊ शकतात. मुंबई इंडियन्सची प्रशिक्षण शिबिरे याच मैदानावर भरवली जातात.