प्रतिनिधी/ चिपळूण
कोरोनाच्या लढाईसाठी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटींची भरघोस मदत केली आहे. या निधीचा धनादेश सोमवारी प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्याकडे पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी सुपूर्द केला. तसेच पतसंस्था अधिकारी व कर्मचारीवर्गाने आपल्या दोन दिवसांचे वेतन एकूण 4 लाख रूपये मदतीचा धनादेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकरिता तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांच्याकडे दिला.
पतसंस्थेच्या ’सहकार वैभव’ सभागृहात सोशल डिस्टनसिंगचा नियम पाळून धनादेश सुपूर्दचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष चव्हाण म्हणाले की, कोकणची अर्थवाहिनी म्हणून संबोधल्या जाणाऱया या पतसंस्थेच्या निर्मितीपासूनच सामाजिक बांधिलकीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रात आपले वेगळे स्थान निर्माण करण्यात संस्था यशस्वी झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आपल्यापरिने प्रयत्न करीत असल्याचे सांगत पतसंस्थेकडून मदतीची घोषणा केली.
यानुसार 1 कोटीचा धनादेश संस्थापक अध्यक्ष चव्हाण यांनी प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्याकडे, अधिकारी व कर्मचाऱयांच्या वेतनातील 4 लाख रुपयांचा धनादेश पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांनी तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांच्याकडे दिला.
या भरघोस मदतीबद्दल समाधान व्यक्त करताना प्रांताधिकारी पवार म्हणाले की, कोरोनाच्या लढाईसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी रुपयांची भरघोस मदत करणारी चिपळूण नागरी ही एकमेव पतसंस्था ठरली आहे. या संस्थेचे कौतुक करावे तितके थोडेच आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांनीही चिपळूण नागरी व प्रशांत यादव यांचे कौतुक करून अभिनंदन केले.
यावेळी पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, सहाय्यक निबंधक बांगर, पतसंस्थेचे उपाध्यक्ष सूर्यकांत खेतले, संचालिका स्मिता चव्हाण, संचालक अशोक कदम, सोमा गुढेकर, राजेश वाजे, सत्यवान म्हामूणकर, रवींद्र भोसले, संचालिका ऍड. नयना पवार, निलिमा जगताप, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, वैभव चव्हाण आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक साबळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारीवर्गाने मेहनत घेतली.
प्रशांत यादव यांच्याकडून 1 लाख
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनीदेखील या मदतकार्यात पुढाकार घेऊन जिल्हा पोलीस दलाकरिता 1 लाख रुपयांची मदत दिली. या रमकमेचा धनादेश उपविभागिय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्याकडे स्वामिनी यादव हिने दिला.