प्रतिनिधी/ चिपळूण
सर्व नियम धाब्यावर बसवून शहरातील मार्कंडी येथील गटार, मोरीचे काम करण्यात येत आहे. यासाठी 96 लाख रूपये खर्च होणार आहे. त्यामुळे या कामास तत्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, या कामास आर्थिक व प्रशासकीय मंजुरी नसताना आणि कोणतीही निविदा न काढता बेकायदेशीरपणे काम सुरू आहे. कामाच्या ठिकाणी कोणताही फलक लावला नसल्याने हे काम कोठून कुठपर्यंत होणार आहे, त्यासाठी किती खर्च येणार आहे, याची माहिती नागरिकांना मिळत नाही. कामाची माहिती मिळावी, यासाठी नगर परिषदेकडे अर्ज केला आहे. मात्र संबंधित कागदपत्रे देण्यास विलंब केला जात असून तोंडी माहिती दिली जात आहे. यासाठी नगराध्यक्षांनी 58/2 चा गैरवापर केला आहे. त्यामुळेच हे काम सुरू असून ते बेकायदेशीर आहे. त्यामुळे या कामाची आपण चौकशी करून त्यास तत्काळ स्थगिती द्यावी व संबधितांविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी मुकादम यांनी केली आहे. एकीकडे या गटार व मोरीमुळे यावर्षी पावसाच्या पाण्याचा त्रास कमी झाल्याचे नागरिक व स्थानिक नगरसेवक सांगत असतानाच मुकादम यांनी तक्रार केल्याने जिल्हाधिकारी नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.