चिपळुणात वटवाघूळ, कोकीळसह सात पक्षी मृत
प्रतिनिधी/ चिपळूण, राजापूर
बर्ड फ्ल्यू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण शहरासह तालुक्यातील विविध भागात मृत पक्षी सापडल्याने खळबळ उडाली आहे. सावर्डे, डेरवण, खेर्डी, कापसाळबरोबरच शहरातील पाग भागात 4 कबुतरांसह कोकीळ, वटवाघूळ आणि कावळे मृतावस्थेत सापडल्यानंतर ते उत्तरीय तपासणीसाठी सहाय्यक आयुक्त रोग अन्वेषण विभाग पुणे-औंध येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. दरम्यान राजापूर शहरात पुन्हा एकदा मृत कावळा आढळल्याने खळबळ उडाली आहे.
बर्ड फ्ल्यू संसर्गाचा शिरकाव दापोलीत झाल्यानंतर सर्वत्र सतर्कतेचे आवाहन करण्यात आले. जिल्हय़ात दापोली, लांजा आणि रत्नागिरी तालुक्यात मृत पक्षी आढळून येत असतानाच चिपळूण तालुक्यात मृत पक्षांची नोंद नव्हती. मात्र गेल्या 5 दिवसात तालुक्याच्या विविध भागात वेगवेगळे पक्षी मृतावस्थेत सापडले आहेत. 12 जानेवारीला सावर्डे येथे मृत कबुतर, 13 रोजी जवळच्याच डेरवण येथे कोकिळा तर 15 रोजी खेर्डी-वरचीपेठ येथे कावळा, कापसाळ-डिकेवाडी येथे तीन कबुतरे आणि 17 रोजी शहरातील पाग जोशी आळीत वटवाघूळ मृतावस्थेत आढळले. विविध ठिकाणी मृतावस्थेत सापडलेले हे सातही पक्षी मानवी वस्तीत होते.
मृत पक्षी आढळल्यानंतर प्रशासनाला कळवण्यात आले. जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून या मृत पक्षांना प्रथम चिपळुणातील विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेत व त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी पुणे-औंध येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर त्या-त्या भागात पुढील आवश्यक उपाययोजना केली जाणार आहे.
राजापुरात आतापर्यंत सापडले 5 मृत कावळे
राजापूर शहरात पुन्हा एकदा कै. मिनाताई ठाकरे संकुल येथे मृत कावळा आढळून आला आहे. नजीकच्या काळात शहरामध्ये 3 तर तालुक्याच्या ग्रामीण भागात 2 असे 5 मृत कावळे सापडले असून यामधील दोन कावळे पुढील तपासणीसाठी चिपळूण येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. रविवारी कोंढेतड-चिंचबांध पुलानजीक रस्त्यावर व सोमवारी हातिवले धावडेवाडी येथे मृत कावळा आढळून आला होता. त्या मागोमाग मंगळवारी सकाळी कै. मिनाताई ठाकरे संकुलमध्ये मृत कावळा आढळून आला. तालुका पशुवैद्यकीय विभागाने मृत कावळा उत्तरीय तपासणीसाठी चिपळूणला पाठवला आहे. आतापर्यत तालुक्यात 5 कावळे व एक कबुतर मृतावस्थेत सापडले. यापैकी 2 कावळे पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. 3 कावळे सडलेल्या अवस्थेत असल्याने पुढील कार्यवाहीसाठी पाठवले नाहीत. तपासणीसाठी पाठवलेल्या कावळय़ांचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. खबरदारी म्हणून शहरातील सर्व चिकन सेंटर, पोल्टीफार्ममध्ये जंतूनाशक फवारणी करण्यात आल्याची माहिती मुख्य लिपिक जितेंद्र जाधव यांनी दिली.