वृत्तसंस्था/ शांघाय
वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य मिळविणारा चीनचा उंच उडीपटू झँग गुवेईने वयाच्या केवळ 28 व्या वर्षी निवृत्ती जाहीर करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
यश मिळविल्यानंतर विशिष्ट पद्धतीने जल्लोष करण्यासाठी ओळखल्या जाणाऱया झँगने 2015 मध्ये झालेल्या बीजिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य जिंकले होते तर 2012 मधील लंडन व 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये त्याने भाग घेतला होता. ‘मला माफ करा, मी आता उडी घेऊ शकत नाही. त्यामुळे मी निवृत्त होत आहे,’ असे झँगने ट्विटर हँडलवरून सांगत त्याच्या 3.4 दशलक्ष चाहत्यांना चकित केले.
मात्र 2015 मध्ये रौप्य मिळविल्यानंतर त्याचा फॉर्म हळूहळू घसरणीला लागल्याचे दिसून आले. 2.28 मी. ही त्याची या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी असून गेल्या फेब्रुवारीत इटलीतील सिएना येथे झालेल्या स्पर्धेत त्याने ती नोंदवली. मात्र ऑलिम्पिक पात्रता मिळविण्यास ती पुरेशी ठरली नाही. 2.33 मी. ही ऑलिम्पिक पात्रतेची मर्यादा ठेवण्यात आली आहे. व्यावसायिक कराराबाबत चायनीज ऍथलेटिक्सचे फार कडक नियम आहेत. त्याचे उल्लंघन केल्याबद्दल गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये त्याच्यावर निलंबनाची कारवाई देखील झाली होती.