6 वर्षांमधील सर्वाधिक पाऊस – पाण्यात बुडालेल्या रस्त्यांवर चालत मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
वृत्तसंस्था / चेन्नई
तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये शनिवारी सकाळपासून होत असलेल्या पावसामुळे पुरासारखी स्थिती निर्माण झाली आहे. 2015 नंतर शहरात पहिल्यांदाच मोठय़ा प्रमाणात पाऊस पडला आहे. अनेक भागांमधील रस्ते पाण्याखाली गेले असून घरांमध्ये पाणी शिरले आहे. प्रशासनाने रविवारी पुराचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा केला असून पाण्यात बुडालेल्या रस्त्यांवर चालून त्यांनी लोकांची भेट घेतली आहे.
शनिवार रात्रीपासून रविवारी दुपारी 1 वाजेपर्यंत चेन्नईत 14 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अण्णानगरमध्ये लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तर चेंबाराबक्कम सरोवराच्या पाण्याचा विसर्ग करण्याचा विचार अधिकाऱयांनी चालविला आहे. राज्य जलसंपदा प्राधिकरणाने कांचीपुरम आणि तिरुवल्लुरच्या जिल्हाधिकाऱयांना सखल भागांमध्ये राहणाऱया लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्याची सूचना केली आहे. चेन्नईच्या वेलाचेरी उड्डाणपुलावर लोकांनी स्वतःची वाहने पार्क केली आहेत.
सरासरीपेक्षा 41 टक्के अधिक पर्जन्य
तामिळनाडूत मान्सून मागील काही दिवसांपासून सक्रिय असल्याने अतिवृष्टी होत आहे. राज्यात सरासरीपेक्षा 41 टक्के अधिक पाऊस पडल्याचे सरकारने सांगितले आहे. 9 नोव्हेंबर रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्याचा अनुमान आहे. मान्सूनमुळे 9 ते 11 नोव्हेंबरदरम्यान आंधप्रदेश आणि तामिळनाडूच्या किनारी भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विविध भागांमध्ये पूरस्थिती
अतिवृष्टीमुळे चेन्नईतील एग्मोर, डाउटन, केएन गार्डन, पदलम, ओटेरी लेफ्ट ब्रिज, पडी ब्रिज, सत्यनगर शेल्टर, बाबा नगर, जीकेएम कॉलनी आणि जवाहर नगर भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. आपत्कालीन स्थितीत बचावमोहीम पार पाडण्यासाठी एनडीआरएफची चार पथके शहरात तैनात करण्यात आली आहेत. चेंगलपेट आणि तिरुवल्लुरमध्ये प्रत्येकी एक तर दोन पथकांना मदुराईत तैनात करण्यात आले आहे. चेन्नईच्या मयलापोरमध्ये 226 मिमी, अंबार्ट्टमध्ये 2,250 मिमी, नंगमबक्कममध्ये 207 मिमी पाऊस पडला आहे. पुंदी सरोवरातून 4 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.