युएईमध्येही आयपीएल स्पर्धेवर संकट कायम : एका गोलंदाजाचा समावेश असल्याचे संकेत
वृत्तसंस्था/ दुबई
चेन्नई सुपरकिंग्स संघातील एका भारतीय जलद गोलंदाजासह एकूण 13 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले असून यामुळे शुक्रवारी भारतीय क्रिकेट वर्तुळात एकच खळबळ उडाली. वास्तविक, कोरोनाचा धोका टाळण्यासाठी ही स्पर्धा भारतातून संयुक्त अरब अमिरातमध्ये हलवण्यात आली. पण, येथेही स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच एका पथकातील 13 सदस्य पॉझिटिव्ह ठरल्याने बीसीसीआय व्यवस्थापनासमोर देखील संकट उभे ठाकले आहे. चेन्नई पथकाचा क्वारन्टाईन कालावधी यामुळे दि. 1 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे.
चेन्नई सुपरकिंग्समधील पॉझिटिव्ह ठरलेल्या त्या भारतीय गोलंदाजाने राष्ट्रीय स्तरावर देखील प्रतिनिधीत्व केल्याची माहिती एका सूत्राने दिली. दरम्यान, एकाच वेळी 13 सदस्य पॉझिटिव्ह आल्याने पूर्ण चेन्नई पथकाची चौथ्यांदा कोरोना चाचणी घेण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला आहे.
चेन्नई सुपरकिंग्ससह रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर (आरसीबी) व विद्यमान विजेते मुंबई इंडियन्स पथकांचे दि. 21 ऑगस्ट रोजी दुबईत आगमन झाले. युएईकडे रवाना होण्यापूर्वी धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्स संघाने चेन्नईतही छोटेखानी सत्रात सराव केला होता. युएईला रवाना होण्यापूर्वी भारतात सराव सत्र घेणारा तो एकमेव संघही ठरला होता.
आयपीएलच्या शिष्टाचारानुसार, खेळाडूंची क्वारन्टाईन कालावधीत पहिल्या, तिसऱया व सहाव्या दिवशी तीन वेळा कोरोना चाचणी घेतली जाणार होती आणि या तिन्ही चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले तरच त्यांना सरावासाठी परवानगी दिली जाणार होती. यादरम्यान, स्पर्धेच्या तयारीत गुंतलेल्या चेन्नई प्रँचायझीसाठी 13 सदस्यांचे पॉझिटिव्ह ठरणे अतिशय धक्कादायक ठरले आहे.
संयुक्त अरब अमिरातीतील दुबई, अबुधाबी व शारजा या 3 ठिकाणी यंदा आयपीएल स्पर्धेतील 60 सामने खेळवले जातील. ही स्पर्धा 53 दिवस चालणार आहे.