आयपीएल टी-20 स्पर्धा : केकेआर 10 धावांनी विजयी, शेन वॅटसनची एकाकी अर्धशतकी झुंज, राहुल त्रिपाठीचा वाटा निर्णायक
वृत्तसंस्था / अबु धाबी
राहुल त्रिपाठीची 51 चेंडूतील धडाकेबाज 81 धावांची खेळी व गोलंदाजांच्या नियंत्रित माऱयामुळे कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल साखळी सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सचा सहज फडशा पाडला. प्रारंभी, केकेआरने 20 षटकात सर्वबाद 167 धावा केल्या तर प्रत्युत्तरात चेन्नईला 5 बाद 157 धावांपर्यंत समाधान मानावे लागले.
विजयासाठी 167 धावांचे माफक आव्हान असताना चेन्नई सुपरकिंग्सचा डाव अनपेक्षितरित्या कोसळला आणि प्रारंभीच्या पडझडीनंतर त्यांना यातून सावरताच आले नाही. प्लेसिस 17 तर अम्बाती रायुडू 30 धावांवर बाद झाले. चेन्नईला त्यानंतर धोनीकडून अपेक्षा होत्या. पण, तो ही वरुणच्या गोलंदाजीवर ऍक्रॉस फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्रिफळाचीत झाला.
चेन्नईने पहिले अर्धशतक 34 चेंडूत तर दुसरे अर्धशतक 43 चेंडूत सर केले. मात्र, त्यानंतर त्यांची धावगती आणखी खालावली. 167 धावांचा पाठलाग करताना ते 5 बाद 157 धावांपर्यंत पोहोचू शकले.
प्रारंभी, सलामीवीर राहुल त्रिपाठीने 51 चेंडूत 81 धावांची तडफदार, आक्रमक खेळी साकारल्यानंतर देखील केकेआरला चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध 20 षटकात सर्वबाद 167 धावांवर समाधान मानावे लागले. फलंदाजी क्रमावरुन वादात असलेले मॉर्गन व दिनेश कार्तिक हे दोन्ही फलंदाज अपयशी ठरले. चेन्नईतर्फे डेव्हॉन ब्रेव्होने 37 धावात 3 बळी घेतले.
या लढतीत केकेआरने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, सलामीवीर शुभमन गिल (11), मधल्या फळीतील नितीश राणा (9), सुनील नरेन (17) स्वस्तात बाद झाल्याने ते पहिल्या टप्प्यात बरेच पिछाडीवर फेकले गेले.
या हंगामात उत्तम बहरात असलेल्या युवा फलंदाज शुभमन गिलला शार्दुलने यष्टीरक्षक धोनीकरवी झेलबाद करत केकेआरला पहिला धक्का दिला. शुभमन व राहुल त्रिपाठी यांनी 4.2 षटकात 37 धावांची सलामी दिली. शुभमनला शार्दुलच्या क्रॉस सीम चेंडूचा अंदाज आला नाही.
तिसऱया स्थानावरील नितीश राणा कर्ण शर्माचा पहिला बळी ठरला. त्याचा स्लॉग स्वीप मारण्याचा प्रयत्न फसला आणि जडेजाने लाँगऑनवर सोपा झेल टिपल्यानंतर केकेआरला आणखी एक धक्का बसला. सलामीला अपयशी ठरत असल्याने चौथ्या स्थानी उतरणाऱया सुनील नरेनचा खराब फॉर्म येथेही कायम राहिला. त्याला 9 चेंडूत 17 धावांचे योगदान देता आले.
नरेनला बाद करताना सीमारेषेवर तैनात जडेजा व प्लेसिस यांच्यातील सुरेख समन्वय चाहत्यांची दाद मिळवून गेला.
नरेनने लाँगऑन व डीप मिडविकेटच्या दिशेने उत्तूंग फटका लगावला. मात्र, दर्जेदार क्षेत्ररक्षणासाठी ओळखल्या जाणाऱया जडेजाने धावत, डाईव्ह लगावत चेंडू अलगद टिपला आणि आपण सीमारेषेला स्पर्शण्याची शक्यता आहे, हे लक्षात येताच शिताफीने चेंडू प्लेसिसकडे सोपवला.
मॉर्गनचे अपयश
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौथ्या स्थानी फलंदाजीला उतरणाऱया इयॉन मॉर्गनला येथे पाचव्या स्थानी पाठवले गेले. पण, तो 10 चेंडूत 7 धावांवर बाद झाला. उसळत्या चेंडूवर फटका लगावण्याच्या प्रयत्नात मॉर्गनचा अंदाज चुकला आणि चेंडू ग्लोव्हजना स्पर्शून यष्टीरक्षक धोनीच्या हातात विसावला होता.
मॉर्गनला मागील लढतीत तळाच्या स्थानी फलंदाजीला पाठवत स्वतः बढतीवर आल्याने दिनेश कार्तिकबाबत वाद निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर, कार्तिक या लढतीत सातव्या स्थानी फलंदाजीला उतरला. पण, तो ही फारसा वेगळा प्रभाव पाडू शकला नव्हता. त्याला 11 चेंडूत 12 धावा जमवता आल्या. शिवम मावीचा धोनीने दुसऱया प्रयत्नात टिपलेला झेल लक्षवेधी ठरला. चेन्नईतर्फे ब्रेव्होने 37 धावात 3 तर सॅम करण, शार्दुल व कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स : राहुल त्रिपाठी झे. वॅटसन, गो. ब्रेव्हो 81 (51 चेंडूत 8 चौकार, 3 षटकार), शुभमन गिल झे. धोनी, गो. ठाकुर 11 (12 चेंडूत 1 चौकार), नितीश राणा झे. जडेजा, गो. कर्ण शर्मा 9 (10 चेंडूत 1 चौकार), सुनील नरेन झे. डय़ू प्लेसिस, गो. कर्ण शर्मा 17 (9 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), इयॉन मॉर्गन झे. धोनी, गो. करण 7 (10 चेंडूत 1 चौकार), आंद्रे रसेल झे. धोनी, गो. ठाकुर 2 (4 चेंडू), दिनेश कार्तिक झे. ठाकुर, गो. करण 12 (11 चेंडूत 1 चौकार), पॅट कमिन्स नाबाद 17 (9 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), कमलेश नागरकोटी झे. प्लेसिस, गो. ब्रेव्हो 0 (2 चेंडू), शिवम मावी झे. धोनी, गो. बेव्हो 0 (1 चेंडू), चक्रवर्ती वरुण धावचीत (जडेजा-धोनी) 1 (1 चेंडू). अवांतर 10. एकूण 20 षटकात सर्वबाद 167.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-37 (शुभमन, 4.2), 2-70 (नितीश राणा, 8.1), 3-98 (सुनील नरेन, 10.6), 4-114 (मॉर्गन, 13.6), 5-128 (रसेल, 15.2), 6-140 (राहुल त्रिपाठी, 16.5), 7-162 (दिनेश कार्तिक, 18.6), 8-163 (नागरकोटी, 19.2), 9-166 (मावी, 19.5), 10-167 (वरुण चक्रवर्ती, 19.6).
गोलंदाजी : दीपक चहर 4-0-47-0, सॅम करण 4-0-26-2, शार्दुल 4-0-28-2, कर्ण शर्मा 4-0-25-2, ब्रेव्हो 4-0-37-3.
चेन्नई सुपरकिंग्स : शेन वॅटसन पायचीत गो. नरेन 50 (40 चेंडूत 6 चौकार, 1 षटकार), फॅफ डय़ू प्लेसिस झे. कार्तिक, गो. मावी 17 (10 चेंडूत 3 चौकार), अम्बाती रायुडू झे. गिल, गो. नागरकोटी 30 (27 चेंडूत 3 चौकार), महेंद्रसिंग धोनी त्रि. गो. वरुण 11 (12 चेंडूत 1 चौकार), सॅम करण झे. मॉर्गन, गो. रसेल 17 (11 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), केदार जाधव नाबाद 7 (12 चेंडूत 1 चौकार), रविंद्र जडेजा नाबाद 21 (8 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार). अवांतर 4. एकूण 20 षटकात 5 बाद 157.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-30 (प्लेसिस, 3.4), 2-99 (रायुडू, 12.1), 3-101 (वॅटसन, 13.1), 4-129 (धोनी, 16.3), 5-129 (सॅम करण, 17.1)
गोलंदाजी : पॅट कमिन्स 4-0-25-0, शिवम मावी 3-0-32-1, चक्रवर्ती वरुण 4-0-28-1, कमलेश नागरकोटी 3-0-21-1, सुनील नरेन 4-0-31-1, आंद्रे रसेल 2-0-18-1.