वृत्तसंस्था/ /सेंट जोन्स
विंडीजचा क्रिकेट संघ तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी पाकमध्ये दाखल झाला आहे. पाकमध्ये आगमन झाल्यानंतर घेण्यात आलेल्या आरटी-पीसीआर चाचणीत विंडीज संघातील चार खेळाडू पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना आता सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे. या समस्येमुळे विंडीज संघातील डावखुरा वेगवान गोलंदाज कॉट्रेल, अष्टपैलू रॉस्टन चेस त्याचप्रमाणे मेयर्स या मालिकेसाठी उपलब्ध होवू शकणार नाहीत. विंडीजच्या प्रशिक्षक चमूतील एका व्यक्तीलाही कोरोनाची बाधा झाली आहे.
सदर माहिती क्रिकेट विंडीजचे सीईओ जॉनी ग्रेव्ह यांनी दिली आहे. कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळलेल्या विंडीज संघातील खेळाडूंना किमान 10 दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये रहावे लागणार आहे. उभय संघातील पहिला टी-20 सामना सोमवारी 13 डिसेंबरला कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर खेळविला जाणार आहे.