शनिवारी मध्यरात्रीनंतरची घटना दोन कार्यालये फोडली : एक दुचाकीही चोरीस : सावंतवाडी, कणकवलीनंतर आता कुडाळकडे मोर्चा : श्वानपथकाला अपयश
वार्ताहर / कुडाळ:
सावंतवाडी, कणकवली शहरानंतर चोरटय़ांनी आता कुडाळ शहराला लक्ष्य केले आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर मुंबई-गोवा महामार्गानजीक कुडाळ-लक्ष्मीवाडी येथील अन्नपूर्णा एन्टरप्राईजेसचे कार्यालय, तर कुडाळ पं. स. नजीकच्या गाळय़ातील साई पॉईंट फायनान्स कॉर्पोरेशन कुडाळ शाखेचे कार्यालय चोरटय़ांनी फोडले. मात्र, काही चोरीस गेले नसल्याचे संबंधितांनी पोलिसांना सांगितले. महामार्गानजीक एका घरासमोरील मोटारसायकलही चोरीस गेली आहे. हीच मोटारसायकल घेऊन चोरटय़ांनी पलायन केले असल्याची शक्यता आहे. श्वानपथकही मागविण्यात आले. पण चोरटय़ांचा माग काढण्यात यश आले नाही.
कुडाळ पं. स. नजीकच्या गाळय़ांमध्ये साई पॉईंट फायनान्स कॉर्पोरेशनचे कार्यालय आहे. रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास या इमारतीचे मालक अजय राऊळ यांना त्या कार्यालयाचे शटर उचकटून काहीसे उघडलेले दिसले. त्यांनी त्या कार्यालयातील कर्मचारी आनंद परब यांना कल्पना दिली. व्यवस्थापक समीर नाईक व अन्य कर्मचारी कार्यालयाकडे आले. चोरीचा प्रयत्न झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरटय़ांनी कटावणीसारख्या हत्याराने शटर वाकवून आत प्रवेश केला. आतील दोन टेबलांचे खण उघडले. एका खणातील प्लास्टिकचा डबा घेऊन बाहेर आले. आतील किरकोळ रक्कम काढून घेऊन तो डबा बाहेर फेकला.
25 हजार रुपये शाबूत
एका खणातील डब्यामध्ये किरकोळ रक्कम मिळाली. त्यामुळे त्या खणात अन्य रक्कम असणार नाही, असे समजून चोरटय़ांनी आतील कागदपत्रे विस्कटली नाहीत. त्यामुळे त्या कागदपत्रांच्या खाली असलेले 25 हजार रु. त्यांच्या हाती लागले नाहीत, असे समीर नाईक यांनी सांगितले.
अन्नपूर्णा एन्टरप्राईजेस फोडले
महामार्गानजीकचे अन्नपूर्णा एन्टरप्राईजेसही चोरटय़ांनी फोडले. कंपाऊंडमध्ये जात चोरटय़ांनी बाहेरील शेडच्या छपरावर चढून एन्टरप्राईजेसच्या कार्यालयाच्या खिडकीचे ग्रील कापून आत प्रवेश केला. आतील टेबलांचे सात-आठ खण उघडून कागदपत्रे विस्कटली. मात्र, काहीच चोरीस गेले नसल्याचे अन्नपूर्णा एंटरप्राईजेसचे योगेश चंद्रकांत नाडकर्णी यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
श्वानपथक घुटमळले
ओरोस येथून श्वानपथक मागविण्यात आले. फायनान्स कॉर्पोरेशन कार्यालयाकडून रस्त्याने निघालेला श्वान नंतर नवीन एसटी डेपोच्या मैदानातून अन्नपूर्णा एंटरप्राईजेसपर्यंत गेला. मात्र, तेथे जाऊन घुटमळला. त्यामुळे कुठल्या तरी वाहनाने चोरटय़ांनी तेथून पलायन केल्याची शक्यता आहे.
कुडाळचे पोलीस निरीक्षक शंकर केरे, उपनिरीक्षक सागर शिंदे व शीतल पाटील, हवालदार हनुमंत धोत्रे, अमोल महाडिक, एस. एन. टाकेकर, दुमिंग डिसोजा व एकनाथ सरमळकर, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक सचिन शेळके, अनुप खंडे व सत्यजीत पाटील घटनास्थळी दाखल झाले. ठसेतज्ञ संजय ठाकुर व के. टी. सोनावणे यांनी दोन्ही घटनास्थळांवरील ठसे घेतले. कुडाळ पोलिसांनी पंचनामा केला.
मोटारसायकलही चोरीस
अन्नपूर्णा एन्टरप्राईजेसपासून काही अंतरावरील महामार्गानजीक रवींद्र गुंडू राऊळ यांच्या घरासमोरील त्यांच्या मालकीची युगा ड्रीम मोटारसायकल (एमएच-07-एई-6188) चोरीस गेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याबाबत त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. चोरी केल्यानंतर ही मोटारसायकल घेऊन चोरटे पळून गेल्याची शक्यता आहे.
फायनान्स कॉर्पोरेशन कार्यालयाच्या गाळय़ाच्या इमारतीला संलग्नच अजय राऊळ यांची इमारत असून त्यात ते राहतात. लाकडी दरवाजा व बाहेरुन शटर आहे. सकाळी दरवाजा उघडला असता, शटरची पट्टी बाहेरून ओढलेली त्यांना दिसली. जाग आल्यानंतर ते अचानक बाहेर येतील, यासाठीच चोरटय़ांनी ती पट्टी ओढली असावी. दोन ते तीन चोरटे असण्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
शहरात पोलिसांची गस्त सुरू असते. महामार्गावरून वाहनांचीही काही प्रमाणात वाहतूक असते. वस्तीच्या आणि मुख्य रस्त्यानजीकच चोऱयांचे धाडस करून चोरटय़ांनी पोलिसांना आव्हानच दिले आहे. दोन दिवसांपूर्वी सऱहाईत टोळीचा सूत्रधार प्रकाश पाटील याला सिंधुदुर्ग पोलिसांनी गजाआड केले आहे. मात्र, चोऱयांचे प्रकार अजून सुरूच आहेत.