2 लाख 30 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत
प्रतिनिधी/ सातारा
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात करंजे तर्फ सातारा येथील एका घराचे बांधकामातील उभे असलेले कॉलमचे बार कोणीतरी अज्ञात चोरटय़ाने चोरुन नेल्याचा गुन्हा शहनाज इस्माईल शेख (रा. कोंडवे ता. जि. सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल केला होता. गुन्हे प्रकटीकरण शाखेने गोपनीय माहिती प्राप्त करून हा चोरीचा गुन्हा उघडकिस आणुन दोन आरोपी सोयब अशपाक शेख (वय 27, रा. करंजेपेठ सातारा), राजेश जगन घाडगे (वय 30, रा. सैदापूर) याना अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्हय़ातील लोखंडी बार व गुन्हा करण्यासाठी वापरलेला टेम्पो असा एकूण 2 लाख 30 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या गुन्हय़ामध्ये सहभाग असलेला सोयब अशपाक शेख हा दि. 3 रोजी त्याचे राहते घरी करंजे येथे आला असल्याची गोपनीय माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली. गुन्हे प्रकटीकरण शाखेने करंजे येथे सोयब यांच्या घराच्या परिसरात जाऊन चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याने सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा पोलिसांनी कौशल्याने तपास केला. यावेळी त्याने गुन्हा केला असल्याची कबुली दिली. हा माल सज्जनगड जाणारे रोडला एका भंगार विक्री करणाऱया भंगार व्यवसायिकास विकल्याची माहिती दिली.
या माहितीवरुन गुन्हे प्रकटीकरण शाखेने भंगार व्यवसायिक राजेश जगन घाडगे यांचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्हय़ातील चोरीचा 30 हजार रुपये किंमतीचा लोखंडी बारचा माल व त्याने गुन्हय़ातील चोरलेले लोखंडी बार बाहुन नेण्यासाठी वापरलेले मालवाहू वाहन टेम्पो असा एकुण 2 लाख 30 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय पतंगे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, पो. हेड. कॉ. हसन तडवी, लैलेश फडतरे, पो.ना. अमीत माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, पो. कॉ. सचिन पवार, स्वप्निल सावंत यांनी केली. गुन्हय़ाचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्टेबल विजय भिंगारदेवे करीत आहेत.