दक्षिण आणि उत्तर बंगालमधील जिल्हय़ांचा समावेश
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज शनिवारी मतदान होत आहे. या टप्प्यात दक्षिण आणि उत्तर बंगालमधील पाच जिल्हय़ांचा समावेश असून त्यात 44 जागा आहेत. अनेक जागांवर भाजप आणि तृणमूल यांच्यात चुरस असून काही ठिकाणी काँगेसचाही प्रभाव आहे.
कूचबिहार, दक्षिण चोवीस परगाणा, हुगळी येथील उरलेल्या जागा अशा ठिकाणी हे मतदान होत आहे. 1 कोटी 15 लाखांहून अधिक मतदार मतदानाचा अधिकार उपयोगात आणणार असून त्यासाठी 10 हजारांहून अधिक मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाची वेळ सकाळी सात ते संध्याकाळी 6.30 अशी असून राज्याच्या तीन मंत्र्यांचे भवितव्य यात पणाला लागले आहे.
हिंसाचारामुळे चिंता
चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू होण्याआधी काही हिंसाचाराच्या घटना घडल्याने तणाव निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाने मतदान सुरळीत व्हावे यासाठी प्रत्येक मतदारसंघात जमावबंदी आदेश लागू केला आहे. तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलांच्या 728 तुकडय़ा नियुक्त केल्या आहेत. प्रत्येक मतदानकेंद्रावर किमान 15 सशस्त्र सुरक्षा सैनिक असतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.