प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटकातील प्रसिद्ध कवी आणि सिनेगीतकार के. कल्याण यांच्या वैवाहिक जीवनात वादळ उठले आहे. बेंगळूरहून सुरू झालेले हे वादळ बागलकोटमार्गे बेळगावात येऊन थडकले आहे. बिळगी, जि. बागलकोट येथील एका मांत्रिकाच्या करणी विद्येमुळे आपल्या 14 वर्षांच्या वैवाहिक जीवनात वितुष्ट आल्याचे स्वत: के. कल्याण यांनी जाहीर केले आहे.
दोन दिवसांपासून बेळगावात हा मुद्दा ठळक चर्चेत आहे. रविवारी सकाळी एका खासगी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद बोलताना गीतकार के. कल्याण यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चार दिवसांपूर्वी माळमारुती पोलीस स्थानकात एक फिर्याद देऊन आपली पत्नी अश्विनी (वय 36), सासरे कृष्णा गुंडूराव सात्विक (वय 70) व सासू राधिका कृष्णा सात्विक (वय 64) या तिघा जणांचे अपहरण झाल्याची फिर्याद त्यांनी दाखल केली होती.
स्वयंपाकाच्या कामासाठी बागलकोटहून बेंगळूर येथील आपल्या घरी आलेल्या गंगा कुलकर्णी या महिलेने बिळगी येथील शिवानंद बसवराज वाली या मांत्रिकाच्या साहाय्याने हे कृत्य घडवल्याचा थेट आरोप त्यांनी केला होता. या दोघा जणांनी आपल्या पत्नीच्या बँक खात्यातील 19 लाख 80 हजार रुपये हडप केले आहेत. बेळगाव येथील आपल्या सासऱयांची मालमत्ताही फूस लावून खरेदी करण्यात आल्याचा आरोप कल्याण यांनी केला होता.
स्वयंपाकाच्या कामासाठी आलेली गंगा कुलकर्णी ही महिला धारवाडमध्ये एकीकडे काम करताना ज्योती कुलकर्णी म्हणून काम करीत होती. शिवानंद वाली हा मांत्रिक आहे. त्याने करणी, भानामतीचा प्रयोग केला आहे. त्यामुळेच आपल्या चौदा वर्षांच्या वैवाहिक जीवनात विघ्न आले आहेत, असे कल्याण यांनी सांगितले आहे. त्यामुळे मांत्रिक, करणी, भानामती आदी मुद्दे ठळक चर्चेला आले आहेत.
माळमारुती पोलिसांनी कल्याण यांची पत्नी अश्विनी यांना बोलावून त्यांच्याकडून माहिती घेतली आहे. कोणीही आपले अपहरण केले नसल्याचे अश्विनी यांनी सांगितले आहे. मात्र, आपली पत्नी चांगल्या स्वभावाची आहे. स्वयंपाकी महिला व मांत्रिकाने दिशाभूल केल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. आपण आपल्या पत्नीशी कायद्याने नव्हे तर प्रेमाने व्यवहार करणार आहोत. जेणेकरून करणी, भानामतीमुळे उठलेले हे वादळ विरून जावे, अशी अपेक्षा या प्रेमकवीने व्यक्त केली आहे.
स्वयंपाकी महिला आणि वशीकरण
स्वयंपाकासाठी म्हणून आलेल्या गंगा कुलकर्णीमुळे आपल्या संसारात कटकटी सुरू झाल्या. उदबत्तीबाबा म्हणून ओळखला जाणारा शिवानंद वालीने वशीकरणाचा प्रयोग केला आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. वशीकरण करूनच लाखो रुपये त्याने आपल्या खात्यात जमा करून घेतले आहेत. बेळगाव येथील मालमत्ताही आपल्या नावे खरेदी केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर पुढील तपास करीत आहेत.